
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाकडून पाळत ठेवण्याचे काम…
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील उसाच्या शेतात लपलेल्या बिबट्यावर पाळत ठेवण्यासाठी वन विभागाने दोन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. पकडण्यासाठी परवानगी नसल्याने फक्त पाळत ठेवण्याचे काम वन विभाग करीत आहे.
तालुक्यातील मुडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसून येत आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तांत्रिक अडचणींमुळे वन विभाग त्याला पकडू शकत नाही, फक्त त्याच्यावर दररोज पाळत ठेवली जात आहे. २३ रोजी वन विभागाने बिबट्या ज्या उसाच्या शेतात लपला आहे तेथे ड्रोन कॅमेऱ्याने तपासणी केली. मात्र कडक उन्हामुळे बिबट्या उसाच्या फडात सावलीत लपला असल्याने तो दिसला नाही म्हणून वनाधिकारी एस बी देसले, वनपाल पी जे सोनवणे, स्वाती खैरनार, एस पी देवरे, रामदास वेलसे व वनमजुर यांनी त्याच्या मार्गावर दोन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. जळगावहून मानद वन्य जीव रक्षक विवेक देसाई हे देखील मुडी येथे आले असून वन कर्मचाऱ्यांसोबत ते देखील रात्रभर बिबट्यावर नजर ठेवणार आहेत. तसेच अद्यापपर्यंत बिबट्याने कोणत्याही जनावरांवर अथवा मानवावर जीवघेणा हल्ला केला नाही अथवा प्रयत्नही केला नाही. म्हणून खास बिबट्यावर अभ्यास करणारी पुणे येथील वन्य जीव एनजीओ पथक बोलावण्यात आले आहे. परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी बाहेर पडू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे.




