
कोयत्याने वार केल्याने दोघे जखमी, चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- कचरा टाकण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात होऊन कोयत्याने वार करून दोघांना जखमी केल्याची घटना २८ रोजी सकाळी ११ वाजता शाहआलम नगरात घडली.

घरासमोर कचरा टाकू नका ह्या कारणावरून वाद होवून एजाज सैय्यद अलीम याच्या पत्नीला अन्वरखान मेहताब, तन्वीर खान अन्वर, इम्रानखान अन्वर, अलिशानबी अन्वर हे चापट बुक्क्यांनी मारहाण करत होते. तन्वीर याच्या हातात कोयता आणि इतरांच्या हातात लाठ्या काठ्या होत्या. एजाज मारहाण करणाऱ्यांना पत्नीला मारू नका म्हणून सांगत असताना अन्वरखान याने काठीने मारहाण सुरू केली. एजाजचे वडील अलीम सैय्यद हमीद भांडण सोडवायला आले असता तन्वीरने हातातील कोयत्याने त्यांच्या हातावर वार करून जखमी केले. एजाज वडिलांना सोडवायला गेला असता तन्वीरने त्याच्याही डोक्यावर गंभीर वार केला. एजाज रक्तबंबाळ होऊन खाली पडला. त्यावेळी चौघे पुन्हा कचरा टाकला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन निघून गेले. दोघा जखमींना तातडीने नर्मदा फाउंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल केले. दवाखान्यात जबाब घेतल्यानंतर चारही आरोपींविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. संतोष पवार करीत आहेत.




