
एक लाख सहा हजाराचा ऐवज लंपास, अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- येथील बसस्थानकावर बसमध्ये जागा सांभाळण्यासाठी ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना ७ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शिरपूर बस मध्ये घडली. एका महिलेचे सुमारे एक लाख सहा हजार ५०० रुपयांचे चार तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल चोरीला गेले आहेत.

सोनाली अनिल तिरमाळे (रा कोलाड ता रोहा जिल्हा रायगड हल्ली मुक्काम वर्धमान नगर अमळनेर) ही महिला ७ रोजी सकाळी (वाडी ता शिरपूर) येथे जाण्यासाठी बसस्थानकवर आली असता शिरपूर बस लागली तेव्हा तिचा जेठ स्वप्नील याने जागा सांभाळण्यासाठी तिची बॅग चालकांच्या मागच्या सीटवर ठेवली. महिला गर्दीतून बस मध्ये चढून दुसऱ्या सीटवर बसली. वाहक तिकीट काढण्यासाठी आल्यावर महिला बॅग घ्यायला चालकांच्या मागच्या सीटवर गेली असता बॅग चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. बॅग मधील ७५ हजार रुपये किमतीची तीन तोळ्यांची सोन्याची पोत , १२ हजार ५०० रुपयांचे सोन्याची कर्णफुले, १२ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र, १५०० रुपये रोख आणि ५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा ऐवज चोरीस गेला होता. महिला परत अमळनेर आल्यावर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.




