
डॉ.विश्वंभर चौधरी व ॲड.असिम सरोदे यांचे प्रतिपादन, निर्भय बनो सभेला हजारोंची उपस्थिती..
अमळनेर:- “मोदींना महागाई आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण लपवायचे आहे.देशातील प्रत्येकाच्या डोक्यावर १ लाख ६० हजारांचे कर्ज मोदीं सरकारने करून ठेवले आहे. संविधानाची मोडतोड केली जातेय! मतदान करतांना लोकशाही व संविधान विसरू नये ! जनतेला लोकशाही किंवा हुकूमशाही निवडायची आहे हे लक्षात ठेवावे.असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी व ॲड.असिम सरोदे यांनी अमळनेर येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या “निर्भय बनो” अभियानाच्या भव्य जाहीर सभेत केले.

साने गुरुजी विद्यालयाच्या भव्य मैदानातील सभेप्रसंगी डॉ.विश्वंभर चौधरी यांनी पुढे सांगितले की, लोकशाही कुण्या एका व्यक्तीवर चालत नाही.एकच व्यक्ती देश चालवतो आहे असे कुणी घमंडी व्यक्ती मानत असेल तर तो १४० कोटी जनतेचा अपमान आहे. स्वातंत्र्याचा लढ्याचा इतिहास यांना मोडून काढायचा आहे. गांधी व आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाच्या नात्यांची मोडतोड करून सांगण्याचा उद्योग सुरू आहे. महाविकास आघाडीला सोडून गेलेल्या आंबेडकरवादी मित्रांना बाबासाहेबांचे तत्वज्ञान धोक्यात आहे हे लक्षात कसे येत नाही?आर.बी.आय नुसार मोदीं सरकारने कॉर्पोरेट समूहाला २५ लाख कोटींची कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांना मात्र कर्ज माफी दिली नाही. ग्रामीण भागातील लोक प्रश्नांवर मतदान करतात.शेतकरी सजग झाले असून यावेळी भाजप २०० च्या पुढे जाणार नाही असे ठामपणे यावेळी चौधरी यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध वक्ते ॲड. असिम सरोदे यांनी यावेळी सांगितले की “देशात यापूर्वीही लोकप्रतिनिधी पळवले गेले, फोडले गेले मात्र महाराष्ट्रात यावेळी आमदार खासदार यांचेसह पक्ष व चिन्हच पळविण्याचा प्रकार घडविण्यात आला तो महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही. महात्मा गांधींच्या पाया पडून त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या नथुराम गोडसेच्या संस्कृतीचे असलेले मोदी देखिल संसदेच्या पायरीवर डोके ठेवून पाया पडीत संविधानाच्या चिंधड्या उडवत आहेत.अदाणीला काश्मिर मध्ये जगातील ७ व्या लिथेनियमचा साठा असलेली जमिन घेता यावी म्हणून मोदींनी कलम ३७० पूर्णपणे रद्द केलेले नसून त्यातील केवळ जमिन खरेदीबाबतचे कलम रद्द केले आहे.मोदींनी पंतप्रधान पदाची गरिमा घालवली आहे. शहीद झालेल्या सैनिकांची सर्वाधिक संख्या नरेंद्र मोदींच्या काळातील आहे म्हणून लोकशाहीची स्वच्छता करणे आवश्यक आहे असेही ॲड.सरोदे यांनी सांगितले.
महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून निर्भय बनो सभेची सुरवात झाली. मंचावर उपस्थित अमळनेर निर्भय बनो चे वक्ते प्रा.अशोक पवार,गौतम मोरे, रियाज मौलाना, संभाजी ब्रिगेड चे राज्यसचिव श्याम पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुस्तक व पुष्पगुच्छ देवून केले. प्रा.डॉ.लिलाधर पाटील यांनी सूत्रसंचलन केले.याप्रसंगी मंचावर निर्भय बनो अभियानाच्या जळगांव जिल्हाध्यक्षा वासंती दिघे व मान्यवर उपस्थित होते.सभास्थळी मा.आ. डॉ. बी.एस. पाटील,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते खलिल देशमुख, यांचेसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभा स्थळी उपस्थित होते.आभार डि ए पाटील यांनी मानले.सभेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सामाजिक संघटनांनी प्रयत्न केले.




