
अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला…
अमळनेर:- तालुक्यातील गांधली येथील महावितरणच्या शेजारी असलेल्या खळवाडीस आग लागल्याची घटना १३ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

गांधली येथे सबस्टेशनच्या बाजुला काटेरी झाडे काढण्यात आली होती. उन्हाने झाडे कोरडी झाली होती. सहा वाजेच्या सुमारास स्पार्किंग किंवा अन्य कारणाने आग लागली. आगीचे स्वरूप वाढल्याने आणि वाऱ्याची दिशा बदलल्याने बाभळाची जिवंत झाडे सुद्धा जळू लागली होती. गावकऱ्यांनी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर याना कळवताच अग्निशमन बंब मागवण्यात आला. अग्निशमन दलाचे प्रमुख दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , योगेश कंखरे यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
त्याच प्रमाणे चांदणी कुऱ्हे येथे देखील १२ तारखेच्या रात्री १२ वाजता नंदलाल धनगर यांच्या खळवाडीस अचानक आग लागली. गावकऱ्यांनी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी घटनेची माहिती कळवताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. तेथेही दल प्रमुख दिनेश बिऱ्हाडे यांच्यासह जफर पठाण , आनंदा झिम्बल , योगेश कंखरे यांनी आग विझवल्याने अनर्थ टळला.




