
रुंधाटी सावखेडा रस्त्यावर घडली घटना, अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
अमळनेर:- रिक्षा अडवून डोळ्यात गावठी दारू फेकून तिघांनी रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड व लाकडी दांडका टाकून डोके फोडल्याची घटना तालुक्यातील रुंधाटी सावखेडा रस्त्यावर १४ रोजी सायंकाळी घडली.

रुंधाटी येथील विजय नवल पाटील हा त्याची रिक्षा (क्रमांक एम एच १५ एफ यु ४९८) वर सावखेड्याला पॅसेंजर सोडून घरी परतत होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दापोरी खुर्द गावाच्या फाट्याजवळ रुंधाटी कडून तिघे जण मोटरसायकलवर येऊन त्यांनी रस्त्याच्या मध्ये मोटरसायकल लावली आणि रिक्षा अडवली. सुरेश प्रकाश भिल (रा दापोरी खुर्द) याने विजय पाटील याला रिक्षमधून ओढून हातातील प्लास्टिकच्या पिशवीतील गावठी दारू डोळ्यात फेकली. विजयचे डोळे आग मारायला लागले तोपर्यंत सोपान भानुदास भिल याने हातातील दगड डोक्यात मारून विजयचे डोके फोडले आणि किरण भिल (रा दापोरी) याने लाकडी दांडा डोक्यात मारला. व सुरेशने परत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विजय त्याना मारू नका म्हणून विनवण्या करीत होता तरी त्यांची मारहाण सुरू होती. त्याचवेळी मठगव्हाण येथील नवल दाजी हे सावखेड्याहुन मठगव्हाण कडे जात असताना भांडण सोडवायला आले त्यांनाही तिघांनी मारहाण केली. नंतर विजय चे चुलत भाऊ शरद पाटील व विजय पाटील यांनी भांडण सोडवले. जखमी विजयला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. अमळनेर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध रस्ता अडवून गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.




