तालुक्यातील रुंधाटी येथील घटना, अमळनेर पोलीसात दंगलीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- शेताच्या वादावरून पाच जणांनी एकाच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकून पिता पुत्राला मारहाण केल्याची घटना १५ रोजी सायंकाळी तालुक्यातील रुंधाटी येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश भास्कर पवार व त्याचे वडील भास्कर पवार १५ रोजी शेतात ठिबक नळ्या टाकून मोटरसायकलने घरी परतत असताना सागर भाईदास पवार याने दोघांना अडवून शेतीच्या जुन्या वादावरून शिवीगाळ सुरू केली. पुन्हा रात्री ८ वाजता सागर हा अतुल शिवाजी पवार , सर्जेराव आंनदा पवार , भाईदास आंनदा पवार , देविदास आंनदा पवार यांना घेऊन आला. त्यांचा गोंधळ पाहून भास्कर पवार बाहेर आले असता सागरने त्यांच्या कानशिलात लगावली हे पाहताच गणेश बाहेर आल्यावर पाचही जणांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले. तर सागरने लोखंडी पाईप आणून गणेशच्या डोक्यात टाकला. गणेश जखमी झाल्याने गावातील लोकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. उपचार घेतल्यावर गणेशने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून पाचही जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.