
अमळनेर:- येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातर्फे खरीप हंगाम पूर्व आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

दिनांक १५ मे रोजी आयोजित सभेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी उपविभागातील अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, व चोपडा या पाच तालुक्यांचा नियोजनाचा आढावा घेतला तसेच बियाणे, खते, आपत्ती व्यवस्थापन, पीकविमा, पिककापणी प्रयोग याबाबत माहिती घेत संबंधितांना सूचना केल्या. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शरद पाटील यांनी कापूस, सोयाबीन, तुर, यासारख्या खरीप हंगामाच्या पिकांच्या लागवडीबाबत, पीकवाढीच्या अवस्था, उत्पादनवाढीची सूत्रे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी उपसंचालक सी. बी. पाटील, सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी तर किशोर साळुंखे यांनी आभार मानले.




