
ऊन लागून गेला दोघांचा जीव, आबालवृद्धही दगावले…
अमळनेर:- यंदाचा मे हिट अमळनेरकराना चांगलाच गांजत असून उच्च तापमान आणि प्रचंड उकाडा यामुळे शहरात नुकतेच दोघांचे बळी गेले असून याआधी देखील अनेक वयोवृद्ध मंडळी जीवानिशी गेली आहे.

मृत्यू उष्माघाताने झाल्या बाबत शवविच्छेदन झालेले नसल्याने अधिकृत आकडेवारी प्राप्त होऊ शकलेली नाही मात्र गेल्या महिन्यात बहुतांश झालेले मृत्यू हे ऊन लागल्याने किंवा उकाड्यानेच झाल्याचे खाजगी डॉक्टरांचे म्हणणे आहे.उन्हाच्या त्रासाने अनेक दवाखाने देखील फुल्ल असल्याचे चित्र सध्या शहरात आहे.दोन दिवसांपूर्वी अमळनेर येथील एका प्रसिद्ध मेडिकल व्यावसायिकाचा मृत्यू झाला.त्यांचाही मृत्यू ऊन लागल्यानेच झाल्याचे सांगण्यात येत आहे.अमळनेर येथे संत सखाराम महाराज यात्रोत्सवात पालखी सोहळ्यानिमित्त केमिस्ट संघटनेच्या वतीने भाविकांना औषधी वाटपासाठी ते गेले होते, दिवसभर कडक उन्हात ते असताना सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना ताप चढला तापाची पातळी चक्क १०८ डिग्री पर्यंत गेली. ताप उतरत नसल्याने अखेर त्यांना धुळे येथे हलविण्यात आले,आणि तेथे शर्थीचे उपचार करूनही दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला.मात्र हे कुटुंबीय दुःखात बुडाल्याने त्यांनी उष्माघाताने बळी गेल्याचा ऊहापोह केला नाही.
त्याचप्रमाणे सुभाष चौकातील पारधीवाडा भागातील श्रद्धा गौरव वाघ (वय २०) ही ३० रोजी घराबाहेर काम करीत असताना तिला ऊन लागले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करून घरी पाठवले. दुसऱ्यादिवशी तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने तिला श्रीदत्त हॉस्पिटल मध्ये नेले तेव्हा डॉक्टरांनी तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टर जी एम पाटील यांनी तिचे शवविच्छेदन केले असून तिचा मृत्यू उष्माघाताने झाला आहे की नाही याबाबत तपासणीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. श्रद्धाचा पती गौरव वाघ याने अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.




