
अमळनेर:- शासनाने ज्वारीला बाजार भावापेक्षा अधिक हमी भाव देऊन खरेदीला मंजुरी दिली असून ३० जून पर्यन्त शेतकी संघाला ज्वारी खरेदी करता येणार आहे. मात्र शासकीय गोदाम मिळण्याबाबत असमर्थता असल्याने ज्वारी खरेदीस विलंब होणार आहे.

मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामाच्या ज्वारीला ३ हजार १८० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करून शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले होते. ४५० शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी एन मगरे यांनी २७ मे रोजी जिल्ह्यातील सर्व केंद्रांना खरेदीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारींनी ठरवून दिलेल्या गोदामात खरेदी केलेला माल साठवण्याच्या अटीवर ही खरेदी करण्यात येणार आहे. अमळनेर तालुका शेतकी संघाकडे स्वतःचे गोदाम उपलब्ध नाही. नित्यनियमाप्रमाणे दरवर्षी जिल्हाधिकारींचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार गोदाम उपलब्ध करून देत असतात. मात्र यावर्षी तहसीलदारांनी गोदाम उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ज्वारी खरेदी शुभारंभ लांबणार आहे. पावसाळा सुरू झाल्यास शेतकऱ्यांना घरून माल आणणे अवघड होईल. तसेच वातावरणातील ओलावा किंवा पावसाने माल ओला झाल्यास ज्वारीला एफ ए क्यू दर्जा मिळणार नाही परिणामी शेतकऱ्यांचा चांगला माल देखील नाकारला जाण्याची शक्यता असल्याने तातडीने गोदाम उपलब्ध करून खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम बाजार समितीच्या आवारात उपलब्ध असून ते रिकामे आहेत. दरवर्षी त्याचठिकाणी धान्य खरेदी केली जाते. शिक्षक आमदारांची निवडणूक लागल्याने आचारसंहिता महिनाभर वाढली आहे त्यामुळे मंत्री ,आमदार याना यात हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे देखील विलंब होण्याची शक्यता आहे.
महसुलकडे रेशन माल ठेवतो तेच गोदाम उपलब्ध आहे. गोदाम कुठे मिळेल ते शोधणे सुरू आहे. शेतकी संघाने परस्पर एफसीआयकडे गोदामाची मागणी करावी.
– रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार ,अमळनेर
सालाबादाप्रमाणे तहसीलदारांना गोदाम उपलब्ध करण्याचे पत्र दिले आहे. गोदाम उपलब्ध झाल्यास लागलीच ज्वारी खरेदी सुरू होईल.
–संजय पाटील, व्यवस्थापक शेतकी संघ, अमळनेर




