अमळनेर:- रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली होती.त्यांचे शव भारतात आणले गेले असून आज सकाळी 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जिशान व जिया यांचा रशियात नदीला पूर येऊन वाहुन गेल्याने दि. ४ जून रोजी मृत्यू झाला होता. मोठया शोधमोहीम नंतर त्यांचे मृतदेह प्रशासनाला सापडले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यावर सुमारे १० दिवसानंतर त्यांचे मृतदेह भारतात आले आहेत. दोघांचे मृतदेह १२ जून रोजी रात्री ११ वाजता मास्को वरून निघून सकाळी ५:३० ला दुबईला पोहचले.दि.१३ जून रोजी दुपारी एक वाजता दुबईवरून निघून मृतदेह सायंकाळी साडे पाच वाजता मुंबई येथे पोहचले असून मुंबई विमानतळावर पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन रात्री १० वाजता मुंबईहून निघणार असून आज सकाळी ९ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. आपल्या पाल्यांच्या मृतदेहाची प्रतिक्षा करत पालकांचे अश्रू देखील रडुन रडून कोरडे झाले आहेत. पुरात वाहून गेल्यानंतर देखील आपली मुले जिवंत सापडतील अशी आशा पालकांना लागली होती. मात्र मृतदेह सापडले असे वृत्त कळताच मात्र पालकांचे अवसान गळाले होते.