
अमळनेर:- तालुक्यात सर्रास वृक्ष तोड सुरु असल्याचे चित्र आहे. मात्र याकडे कुणीही लक्ष घालत नसल्याने, वृक्ष तोडीवर आळा घालून कारवाईची मागणी वृक्षमित्रांमधून होत आहे.

दरवर्षी पावसाळा अत्यल्प होत चालला असताना दिवसेंदिवस सर्वत्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मात्र तालुक्यातील बिनधास्त वृक्षतोड़ केली जात आहे. यावर्षी लवकर शेत शिवारातील कामे आटोपल्याने शेतात वृक्ष तोड सुरु आहे. थोड्याशा पैश्याकरिता शेतातील मध्यभागी व बांधावर उभे असलेले डेरेदार वृक्ष तोडले जात आहेत. परिणामी शेत शिवारात झाडांची संख्या खूपच कमी दिसून येत आहेत.
वृक्षतोड करणारी टोळी सक्रीय…
परिसरात एक दिवस अगोदर येऊन पाहणी करून वृक्ष तोड करणाऱ्याचे तालुक्यात सर्वत्र दलाल सक्रिय आहेत.या दलाला मार्फत परिसराची पाहणी करून गेल्यानंतर वृक्षतोड करणारी सात ते आठ जणांची ही टोळी अत्याधुनिक समुग्रीच्या साहाय्याने डेरेदार वृक्षाला एका तासाभरात त्याचे लहान-लहान तुकडे करतात. त्यामूळे त्याठिकाणी डेरेदार वृक्ष होता की नाही हेच कळत नाही.
रात्रीची चोरटी वाहतूक…
दिवसा वृक्ष तोड करून सायंकाळच्या सुमारास शेताच्या परिसरात वाहन घेऊन जात रात्री आठ ते दहा वाजेच्या सुमारास चोरटी वाहतूक करून लाकुड वाहतूक सुरु आहे. अत्याधुनिक अवजारामुळे डेरेदार वृक्ष काही वेळेतच आडवा पडून नष्ट केले जात असल्याने वृक्ष प्रेमीमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.मात्र याबाबत जबाबदार अधिकारी यानी लक्ष घालून कारवाईची मागणी होत आहे. सर्वत्र वृक्ष तोड सुरु असताना संबंधीत अधिकारी झोपेचे सोंग घेऊन कानाडोळा करीत असल्याचा आरोप करीत आहेत.




