किसान काँग्रेसची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…
अमळनेर:-जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा प्रलंबित पीक विमा व इतर शेतीविषयक अनुदान तात्काळ मिळावे यासाठी जिल्हा किसान काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगाम सन २०२३-२४ मध्ये ज्या महसुल मंडळात पावसाचा खंड पडून दुष्काळ पडला अश्या मंडळांना उर्वरीत ७५ टक्के पिकविमा देण्यात यावा. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ, तसेच रोगराईमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्याने बाधित शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केलेली होती त्या अनुषंगाने सदरील पिक विमा कंपनीने (ओरीएन्टल इन्शुरन्स) पंचनामे देखील केलेले होते मात्र त्यांना पीक विमा मिळू शकलेला नाही.
सन २०२३ मध्ये जिल्ह्यातील सर्वच मंडळामध्ये तापमान ४५ डिग्री पेक्षा जास झाल्याने जिल्ह्यातील फळ बागायतदार (केळी) शेतकऱ्यांना हवामान आधारीत पिकविमा मिळावा.
अमळनेर तालुक्यातील ८ ही मंडळात २०२१-२२ मध्ये अतिवृष्टी, अवकाळी व गुलाबी वादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते ‘त्यांनतर शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देऊ अशी घोषणा केली होती परंतु आजतागायत वेळोवेळी पाठपुरावा करून सुध्दा शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेले हेक्टरी अनुदान तसेच मागील महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी असे निवेदनात म्हटले आहे. १५ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास किसान काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पिरण पाटील,कार्याध्यक्ष प्रा.सुभाष पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती धनगर दला पाटील, बाजार समितीचे संचालक डॉ.अनिल शिंदे, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पवार उपस्थित होते.