
जागतिक स्तरावरील सायन्स लॅब पाहण्यासाठी जपानला रवाना…
नंदुरबार:- जिल्ह्यातील तोरणमाळपासून २० किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम भागातील झापी-बोदीबारी पाडा येथील मिलेश पावरा ह्या शाळाबाह्य विद्यार्थ्याने २०१७ मध्ये शाळेत प्रवेश घेत यंदा दहावीत प्रथम क्रमांक पटकावला तसेच जागतिक स्तरावरील सायन्स लॅब पाहण्यासाठी जपानला १५ जून रोजी रवाना झाला. तोरणमाळ परिसरातून विदेशात जाणारा मिलेश हा पहिलाच विद्यार्थी आहे.

तोरणमाळपासून दरीत २० किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम भागातील झापी-बोदीबारी पाडा या गावाला जाण्यासाठी नदी-नाले, डोंगर कपारीतून पायवाटेने जवळपास तीन तास पायी प्रवास करावा लागतो. झापी-बोदीबारी पाडा येथील मिलेश झुंगाल्या पावरा हा आई वडिलांसह राहतो. मिलेशचे आई- वडील निरक्षर असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. निलेश हा शाळाबाह्य विद्यार्थी होता. त्याला जून २०१७ मध्ये तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय शाळेत दाखल करण्यात आले. त्याने शाळेत आपल्या गुणांची चुणूक दाखवली. मिलेश याने नुकतेच दहावीच्या परीक्षेत ८६% मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.मोठ्या शहरांसाठी विदेशात जाणे ही मोठी बाब नसली तरी सातपुड्यातील दुर्गम भागातील शाळाबाह्य विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तो जपानला निघाला, ही बाब नक्कीच प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत वंचित व दुर्बल घटकासाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात कस्तुरबा गांधी व महाराष्ट्रातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावरील सायन्स लॅब पाहण्यासाठी संधी मिळावी म्हणून भारत सरकारने सुकुरा सायन्स हायस्कूल प्रोग्राम २०२४ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात जपान येथे जागतिक स्तरावरील सायन्स लॅब पाहण्यासाठी भारतातून २१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातून मिलेश पावरा हा एकमेव विद्यार्थी आहे. १० दिवस हे विद्यार्थी जागतिक स्तरावरील सायन्स लॅबमध्ये वेगवेगळी माहिती जाणून घेणार आहेत. जपान जाण्यासाठी मिलेश पावरा हा १४ जून रोजी मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्यासह दिल्ली येथे रवाना झाला. १५ जून रोजी सायंकाळी जपान येथे जाण्यासाठी मिलेशसह विद्यार्थी रवाना झाले. तोरणमाळ परिसरातील विदेशात जाणारा मिलेश पावरा हा एकमेव विद्यार्थी आहे.
तोरणमाळ केंद्रातील अतिदुर्गम २० गावांतील शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी तत्कालिक प्रधान सचिव शिक्षण विभाग नंदकुमार यांच्या संकल्पनेतून २०१७ मध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय निवासी शाळा, तोरणमाळ येथे महाराष्ट्रातील पहिली समूहशाळा निर्माण केली. सदरील शाळेत सर्व सुख-सुविधा निर्माण करून २० गावांतील १ हजार ६४९ विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावीचे शिक्षण घेत असून यावर्षी दहावीचा १००% निकाल लागला आहे. या यशाबद्दल मिलेशसह त्याचे आई वडील तसेच मुख्याध्यापक सुधीर पाटील व शिक्षकवर्गाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




