
अमळनेर:- नुकत्याच १७ जूनला झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीत तालुक्यातील १२ गावांच्या १ हजार५४८ शेतकऱ्यांच्या १ हजार ४४६.१० हेक्टर क्षेत्राच्या कापूस, मका, तूर, ज्वारी, उडीद, मूग व फळबागांचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाले आहे.

एकाच दिवशी ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस सुमारे तीन मंडळात झाल्याची नोंद आहे. पावसाचे प्रमाण इतके भयानक होते की, लोंढवे गावात पाणी शिरून शेतशिवारातील माती, ठिबक नळ्या, लावलेले बियाणे, उगवलेली पिके वाहून गेली. काही शेतांमध्ये नद्या नाल्यांचे दगडगोटे देखील वाहून आले होते. काही नाल्यांचे बांध, बंधारे फुटून शेतांमध्ये पाणीच पाणी झाले होते. नुकतेच टाकलेले खते तसेच सुपीक माती वाहून गेल्याने अनेकांची शेती उध्वस्त झाली आहे.
कृषी विभाग व महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार प्राथमिक नुकसानीचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. तालुक्यातील शिरूड मंडळात सर्वाधिक पाऊस पडला असून लोंढवे, निसर्डी, जानवे ,रणाईचे बुद्रुक, रणाईचे खुर्द, खडके, आंचलवाडी या गावांमधील जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच वाघोदे, शिरूड, इंदापिंप्री, फापोरे बुद्रुक,पिंपळे बुद्रुक या गावांच्या शेतीचे देखील नुकसान झाले आहे.
या १२ गावातील कापूस पिकाचे १२१४ हेक्टर क्षेत्र, मका २२५.४० हेक्टर व तूर आणि फळबाग यांचे अल्प प्रमाणात नुकसान झाले आहे. लोंढवे येथे एकूण ४०७.५० हेक्टर क्षेत्र नुकसान झाले पैकी ३९० हेक्टर कापूस पिकाचे नुकसान आहे. खडके येथे २४५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान असून पैकी १७५ हेक्टर कापूस पिकाचे व ७० हेक्टर मका पिकाचे नुकसान झाले आहे. १२ गावांपैकी दहा गावे शिरूड मंडळातील तर पिंपळे बुद्रुक आणि खडके ही गावे वावडे मंडळात आहेत. तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी संयुक्तरित्या अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे.
प्रतिक्रिया…
पावसाच्या नोंदी जरी महसूल मंडळाच्या एका ठिकाणी होत असल्या तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठी नैसर्गिक आपत्ती आल्याने नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना नियम आणि निकष प्रमाणे शेतकरी हिताचे निर्णय कसे घेता येतील याबाबत कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.
– अनिल भाईदास पाटील, मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र राज्य




