सोबत 100 साधू संतांचाही प्रवेश, श्री मंगळग्रह मंदिरापासून निघणार भव्य स्वागत रॅली…
अमळनेर:- स्व-पर कल्याणासाठी 55000 की.मी.ची पदयात्रा करणारे युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचा आज रविवार दि.23 रोजी अमळनेरात नगरप्रवेश होत असून त्यांच्या सोबत 100 साधू संतांचाही नगरप्रवेश होणार आहे.
आचार्यश्री महाश्रमण जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे 11 वे अनुशास्ता आहेत.
श्री मंगळग्रह मंदिरापासून सकाळी ठीक 9 वाजता त्यांची भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी 10.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मुख्य प्रवचन होणार आहे. यानिमित्ताने स्वागत रॅली मार्गावर स्वच्छता मोहीम राबवून रस्ते चकचकीत करण्यात आले असून शहरात विविध ठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. तब्बल 25 वर्षानंतर या त्यांचे अमळनेर येथे आगमन होत आहे.काल रात्रीचा मुक्काम चांदणी कुर्हे येथे केल्यानंतर सकाळी 9 वाजता त्यांचा नगरप्रवेश होऊन त्यानंतर मंगळग्रह मंदिरापासून स्वागत रॅली निघेल ही रॅली तेथून पाचपावली चौक,आयडीबीआय बँक, आचार्य श्री तुलसी महाप्रज्ञ चौक,तेरापंथ भुवन,रिषभ फर्निचर येथून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पोहोचल्यावर समारोप होणार आहे.सकाळी 10.15 वाजता मुख्य प्रवचन त्यानंतर रात्री 8 वाजता मुंदडा ग्लोबल स्कुल येथे अर्हत वंदना तथा चरण स्पर्श होणार आहे.यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील,खासदार स्मिता वाघ,श्री जैन श्वेतांबर खान्देश सभा चे अध्यक्ष नान कराम तनेजा यांची प्रमुख उपस्थिती तर माजी आमदार डॉ बी एस पाटील, साहेबराव पाटील,शिरीष चौधरी, मुंदडा फाऊंडेशनचे ओमप्रकाश मुंदडा,उद्योजक बजरंगलाल अग्रवाल, मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,डॉ अनिल शिंदे व संदीप घोरपडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी या पावन प्रसंगी सर्व समाजबांधवांनी दर्शन आणि प्रवचन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल जैन श्री संघ व आयोजक श्री जैन श्वेतांबर तेरापंथ सभा,तेरापंथ महिला मंडळ,तेरापंथ युवक परिषद अमळनेर यांनी केले आहे.