
अमळनेर:- संत सखाराम महाराजांच्या पायी वारीचे २३ रोजी अमळनेरातुन पंढरपूर कडे ह.भ.प.प्रसाद महाराजांच्या उपस्थितीत हजारो भाविकांच्या समवेत रामकृष्णहरीच्या गजरात प्रस्थान झाले.

सुमारे २३९ वर्षाची परंपरा या वारीला असून अमळनेर ते पंढरपूर पायी वारी यावर्षीही संत श्री प्रसाद महाराजांच्या नेतृत्वात २३ जून ते १५ जुलै दरम्यान काढण्यात आली आहे. अमळनेर ते पंढरपूर सुमारे ५७५ कि.मी पायी वारीचे २४ दिवसाचे नियोजन संस्थांनतर्फे केले गेले आहे. सन १७८५ पासून ही वारी सुरू आहे.
या पायी वारीला जाणाऱ्या भाविकांची दोन दिवस अगोदर वाडी संस्थांतर्फे नोंदणी केली गेली असून अमळनेरहुन दोनशेपेक्षाही अधिक वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. पुढे ही वारकऱ्यांची संख्या पहिल्या ठिकाणाहून वाढत वाढत जाऊन करमाळापर्यंत ७०० ते ८०० पर्यंत होते.वारीत साधारणतः रोज २५ ते ३० किलोमीटर चालत पायी चालणे असते. अमळनेरहुन पायी वारी २३ जून रोजी सकाळी पाच वाजता संत श्री प्रसाद महाराज यांचे प्रस्थानाचे भजन होऊन नंतर महाराजांनी पांडुरंगाचा निरोप घेऊन साडे सहा वाजता वाडी मंदिर सोडून पैलाड भागातील तुळशीबागेत पोहोचले. त्यानंतर महाराजांचा सकाळचा पूजापाठ आणि तुळशीपत्र तुळशी बागेत झाले, त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी तुळशीबागेत उपस्थित होते.
दुपारी बारा वाजता महाराज वाडी संस्थांनाचे मानाचे विश्वस्त फुलांचा हार महाराजांच्या गळ्यात टाकून सत्कार केला,त्यानंतर वाडी संस्थानाचे पुजारी यांनी महाराजांच्या डोक्यावर घोंगडी टाकून व गळ्यात विना आणि हातात चिपळ्या देऊन पांडुरंगाच्या नामस्मरणाने दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. याचबरोबर पायी वारीत महाराजांसोबत पांडुरंगाची मूर्ती तसेच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, आणि नाथ भागवत असे तीन ग्रंथ महाराजांसोबत असतात. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत वारी पारोळा कडे प्रस्थान झाली. यावेळी राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.




