
नातेवाईकांनी शव आणले तहसील कार्यालयात, चारही आरोपींना केली अटक…
अमळनेर:- घरात डुकरे घुसून अन्नधान्याचे नुकसान करतात त्यांना कोंडून ठेवा असे सांगण्याचा राग आल्याने चौघांनी एकाला मारहाण केली. म्हणून त्याने स्वतःला रॉकेल टाकून जाळून घेतल्याची घटना २५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे घडली. विलास भाईदास घिसाडी असे मयताचे नाव असून चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील शिरूड येथील गणेश भाईदास घिसाडी व त्याचा भाऊ विलास भाईदास घिसाडी यांच्या घराच्या मागच्या बाजूला रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रवीण भुरा वडर, सुदाम भुरा वडर हे लोक राहतात. त्यांची मोकाट डुकरे आजूबाजूच्या घरांमध्ये घुसून अन्न धान्याची नासाडी करतात म्हणून त्यांच्यात वाद होते. २५ रोजी सकाळी विलास कन्हेरे फापोरे येथे गेले होते. दुपारी तीन वाजता विनोद वडर याच्या डुकरांनी पुन्हा अन्न धान्याची नासाडी केली म्हणून विलास बोलायला गेला असता विलासला चौघांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. चौघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विलास याने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याने धुळे पोलिसांना चौघांविरुद्ध जबाब दिला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयताच्या नातेवाईकांनी २६ रोजी शव तहसील कार्यालयात आणले. मात्र यावेळी शिक्षक मतदार संघाचे मतदान सुरू असल्याने शव आणणारी रुग्णवाहिका बाहेरच थांबवण्यात आली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी लावून धरली. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करून चौकशी करण्याच्या सूचना दिल्यात. गणेशच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. चारही जणांना अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.




