
अमळनेर पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- वन क्षेत्रात बकऱ्या का चारतो असे विचारण्याचा राग आल्याने दोघांनी वनमजुराला मारहाण केल्याच्या घटना जानवे भागात घडली आहे.

जानवे महिंदळे भागात वनविभागाने नवीन झाडे लावली असून २७ रोजी कायम वनमजूर म्हणून कार्यरत असलेले पुंजू वेडू निकम हे गस्त घालीत असताना त्यांना अमोल सुनील भील (रा. जानवे) हा बकऱ्या चारत होता. त्यास निकम यांनी त्यास सांगितले की, ही जागा वनविभागाची असून येथे बकऱ्या चारू नको, बकऱ्या काढून घे. मात्र त्याचा राग आल्याने सुनील याने जंगल काय तुझ्या बापाचा आहे का असे बोलून शिवीगाळ करून दगड मारून फेकला. तसेच त्याचा भाऊ बापू सुनील भील याला बोलवून घेतले. वनमजूर निकम हे वनपाल प्रेमराज सोनवणे यांच्याशी फोनवर बोलत असताना बापू भील याने काठी घेवून निकम यांच्या डाव्या डोळ्याच्या खाली मारल्याने दुखापत झाल्याने रक्त वाहू लागले. तसेच अमोल याने देखील चापटा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी समाधान पाटील याने निकम यांची सोडवणूक करत जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर निकम यांनी अमळनेर पोलिसांत तक्रार दिली असून दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ कैलास शिंदे हे करीत आहेत.




