शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानदारांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन…
अमळनेर:- अमळनेर नगरपरिषदेच्या बाजूलाच नव्याने काँक्रिट रस्ता बनवला असून सदर काम नित्कृष्ट असून दुकानदारांना त्रासदायक ठरत असल्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
मुख्याधिकारी यांना दुकानदारांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नगरपरिषदेच्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाजूला नुकताच सिमेंट काँक्रिटचा नवीन रस्ता बनविण्यात आला आहे. मात्र रस्ता नित्कृष्ट असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे ठेकेदाराने कसा रस्ता बनवला यावर शंका आहे. पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पाणी उडते, तसेच शेवाळ साचल्याने अनेक ग्राहक याठिकाणी घसरून पडतात. त्यामुळे ग्राहकांसोबत दुकानदारांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व दुकानदारांनी लाखो रुपये देवून दुकाने घेतली असून दुकानासमोरच पाणी साचत असल्याने व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सदर ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्त करून घ्यावा अन्यथा त्याचे बिल अदा करू नये अशी मागणी दुकानदारांनी केली आहे. मात्र सदरची दुरुस्ती न केल्यास करभरणा करणार नाही, असा इशारा ही देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया…
पुढील आठवड्यात रस्त्याची पाहणी करून ड्रेनेजची व्यवस्था करण्यात येईल, यात दुकानदारांचे नुकसान होवू देणार नाही.
:- तुषार नेरकर, मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद