
पालिकेने केलेल्या उपयोजना ठरतयेत निरर्थक,परिस्थिती जैसेथे…
अमळनेर:- शहरातील न्यू प्लॉट भागात पावसामुळे बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य चक्क रस्त्यावर तलावच अवतरत असून यासंदर्भात अनेक तक्रारी केल्यानंतर थोड्याफार उपाययोजना केलेल्या असल्या तरी त्या निरर्थक ठरून पुन्हा आहे तीच परिस्थिती होत आहे.
सुरुवातीच्याच पावसानेच अशी परिस्थिती असेल तर अजून तीन महिने पावसाळ्यात काय हाल होणार हे सांगणे अवघड आहे. पावसामुळे अमळनेर शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे. पाणी निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना दिसत नाही. प्रामुख्याने शहरातील न्यू प्लॉट भागात बँक ऑफ वडोदरा, ग्रामीण बँक, दादावाडी दरम्यान वाहतूक वाढीने आधीच रस्त्याची चाळण झाली आहे.पावसाचे मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी त्यात रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यातून वाहतूक करताना नागरिकही हैराण होत असून हे खड्डे अपघातांना आमंत्रण देणारे ठरत असल्याने उपाययोजना करणाची गरज आहे. रोज येथून खाजगी कामासाठी तसेच शाळकरी मुली ये-जा करतात. दिवसभरात हजारो लोक तेथून वापरतात. वाहने चालवणे तर सोडाच; पण या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले अशी अवस्था झाली आहे.यासंदर्भात तक्रारी नंतर चारी करून पाणी गटारीत निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी ही उपाययोजना निरर्थक ठरत असून ठोस उपाययोजनासह हा रस्ता तातडीने नवा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
व्हाईट बिल्डिंग शाळेजवळही तीच परिस्थिती…
व्हाईट बिल्डिंग शाळा ते आयडीबीआय बँक दरम्यान रस्ता जुना व अतिशय खराब झाल्याने हा रस्ता होणे अत्यंत आवश्यक आहे. याठिकाणी बोहरा जमात जवळ असलेल्या चौकात देखील पाऊस पडल्यावर नेहमीच तलाव साचत असून पाणी अक्षरशः दुकानात शिरते, बाजाराकडे जाणारा हा रस्ता असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. याठिकाणी पालिकेने चारी करून पाणी काढण्याचे काम हाती घेतले होते मात्र हे काम अर्धवट सोडून देण्यात आल्याचे परिस्थिती जैसेथे आहे.
सतत पाण्याखाली राहणाऱ्या या रस्त्यांवर उपाययोजना आवश्यक…
याच साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरून नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. पावसाळ्यात सदर दोन्ही रस्त्याचा भाग पूर्णपणे पाण्याखालीच राहतो.कायम पाणी त्याठिकाणी साचलेले असते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही कायमची समस्या असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना न नवीन रस्ता होणे गरजेचे असल्याची मागणी न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी केली आहे.




