
,
रॅम्प नाही आणि नादुरुस्त इमारतींमुळे प्रशासनाने घेतला निर्णय
अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून मतदारांना येणाऱ्या अडचणी व मतदान केंद्राची नादुरुस्ती याचा विचार करत उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी सतरा मतदान केंद्रात बदल करण्यास मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी विधानसभेची तयारी म्हणून मतदान केंद्राची पाहणी केली. त्यात काही खोल्या नादुरुस्त , काही खोल्या मोडकळीस आलेल्या तर काही ठिकाणी एकाच शाळेत पाच पाच केंद्र असून एकच मार्ग येण्यासाठी व जाण्यासाठी असल्याने गर्दी होते. म्हणून मतदान केंद्रेच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तसा प्रस्ताव जिल्हाधिकारीकडे पाठवला आहे. अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील स्व अनिल अंबर पाटील प्राथमिक विद्यालयातील दोन मतदान केंद्रे बोरी नदी काठावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र व सामाजिक भवन मध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. शेतकरी सहकारी संघातील एक मतदान केंद्र राणी लक्ष्मीबाई चौकातील समाज मंदिरात तर दुसरे मतदान केंद्र सुभाष चौकातील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग मध्ये हलवण्यात येणार आहे. जययोगेश्वर माध्यमिक विद्यालयातील एक मतदान केंद्र मतदारांना जायला पुरेशी जागा नसल्याने नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात येणार आहे. वनिता समाज मंडळाच्या शाळेतील मतदान केंद्रात रॅम्प नसल्याने न्यू व्हिजन स्कूल मध्ये हलवण्यात येणार आहे. तसेच १२ नंबर शाळेत पाच मतदान केंद्र असल्याने तेथील दोन मतदान केंद्रे न्यू व्हिजन स्कूल मध्ये तर तिसरे मतदान केंद्र उर्दू शाळा क्रमांक ६ मध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे.
तसेच तालुक्यातील जळोद जिप प्राथमिक शाळा खोली क्रमांक २ ऐवजी ३ , मारवड शाळा खोली क्रमांक ३ ऐवजी १ , मालपूर येथील पत्र्याची खोली नादुरुस्त झाल्याने खोली क्रमांक २ ऐवजी ३ , नगाव ,बहदरवाडी येथे पत्र्याची खोली नादुरुस्त असल्याने स्लॅब च्या खोलीत मतदान केंद्र हलवण्यात येणार आहे. खेडी ढोक येथेही जुन्या इमारतीमधून नव्या इमारतीत स्थलांतर करण्यात येणार आहे. मतदान केंद्रे बदलवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून मंजुरी नंतर अमलबाजवणी करण्यात येणार आहे.




