अमळनेर : येथील पोलीस स्टेशनचा लँडलाईन नंबर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. नागरिकांना पोलिसांशी संपर्क करण्यास खूप अडचणी येत आहेत. तरी देखील बीएसएनएल विभाग दुर्लक्ष करीत आहे.
अमळनेर पोलीस स्टेशन शहराबाहेर चार ते पाच किमी अंतरावर आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनचा लँड लाईन फोन हाच पोलिसांशी संपर्क साधण्याचा सुकर मार्ग आहे. तातडीची घटना घडल्यास लँड लाईनवर कळवण्यात येते. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून हा फोन बंद झाल्याने नागरिकांचा पोलिसांशी संपर्क होत नाही. पोलिसांनी अनेकवेळा बीएसएनएल कडे तक्रारी करूनही काहीच उपयोग झाला नाही. बीएसएनएल कडे कर्मचारी व यंत्रसामुग्री अपूर्ण पडत असल्याने फोन दुरुस्त होत नाही.