
दोन वर्षांपासून ऊसतोड मजूरीचे पैसे घेऊन फरार आरोपी केला जेरबंद…
अमळनेर:- कोल्हापूर जिल्ह्यातील ईचलकरंजी येथील साखर कारखान्यासाठी ऊसतोड मजूरीचे पैसे घेऊन दोन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी चोपडा येथील कारगिल चौकातून अटक केली आहे.
अंबर हिरामण भिल (रा साळवे ता शिंदखेडा) या ठेकेदाराला इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखान्यासाठी ऊस तोड मजूरांची आवश्यकता होती. १९ सप्टेंबर २०२२ रोजी ते जानवे येथे गेले. तेथे धोंडू पंडित भिल याच्या माध्यमातून ज्ञानेश्वर झुलाल भिल, मुकेश छोटू भिल, भुरा प्रकाश भिल, अजय तुकाराम भिल, समाधान जिजाबराव भिल, कल्पनाबाई नाना सोनवणे, शेखर सोमा भिल, संतोष बुधा भिल,अजय अनिल भिल, हिरामण दुला भिल, शिवाजी रावण भिल, सुनंदाबाई अशोक भिल, जीवन सुधाकर भिल यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी प्रत्येकी ४० हजार रुपयांप्रमाणे १४ जणांचे ५ लाख ६० हजार ऍडव्हान्स घेऊन करारनामा करून दिला. ६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजता जेव्हा अंबर भिल त्यांना ऊस तोडणीसाठी घ्यायला गेले असता मजुरांनी नकार दिला. व पैसेही परत करायला नकार दिला म्हणून १४ जणांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दहा आरोपींना पोलिसानी अटक केली होती. मुख्य आरोपी धोंडू सोनवणे पोलिसांना चकवा देत होता. वारंवार मोबाईल सिम बदलवून पळून जात होता. अखेर तंत्रज्ञ पोलीस उज्वल पाटील यांच्या मदतीने आरोपीच्या विविध मोबाईलच्या माहितीवरून आरोपीचा ठावठिकाणा चोपडा तालुक्यात असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या आदेशाने हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे, विनोद सोनवणे, राजेंद्र देशमाने चोपडा येथे गेले. मात्र आरोपी सहजासहजी सापडणार नाही म्हणून पोलिसांनी आरोपीला फोन करून आम्हाला ऊसतोड मजूर लागणार आहेत असे सांगून त्यांना भेटायला बोलावले. आरोपीने पोलिसांना मी धानोऱ्याहून मजूर घेऊन १० रोजी रात्री ९ वाजता चोपडा येथील कारगिल चौकात येतो असे सांगितले. कारगिल चौकात आरोपीसह बरेच मजूर आल्याने पोलीस दचकले. नेमका आरोपी कोण ? कसा ओळखावा ? याबाबत पोलीस सांशक होते. आरोपीला जावई म्हणतात हे माहीत असल्याने एकाने जावई म्हणून आवाज दिला आणि त्याला धोंडूने प्रतिसाद देताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला अटक करताच इतर मजुरांनी पोलिसांची गाडी रोखून आरोपीला गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेगाने गाडी पळवून अखेर आरोपीला अमळनेर पोलीस स्टेशनला आणले.




