मान्यता रद्द झालेल्या प्रतापच्या १७ शिक्षकांना उच्च न्यायालयाचा दिलासा, माजी आमदार व प्रा.पवारात जुंपली…
अमळनेर:- शिक्षण क्षेत्रात असंतोष, भीती व दहशत निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठविणार असल्याचा इशारा शिक्षक नेत्यांनी पत्रकार परिषदेत देत मान्यता रद्द झालेल्या प्रताप महाविद्यालयाच्या 17 शिक्षकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून शिक्षकांचे वेतन नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याची माहिती शिक्षक नेते प्रा.अशोक पवार यांनी पत्रकारांना दिली.
मराठा मंगल कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. शासकीय अधिकारी हे न्यायालयापेक्षा वर्चढ समजतात अशी टिपणी मा. न्यायालयाने करुन डॉ.श्रीराम पानझडे यांचे दि. १८ जून २०२४ चे आदेश रद्द केले असुन शिक्षकांचे पगार नियमित सुरु ठेवावे असे निर्देश देऊन यापुढे १७ शिक्षक आणि ४ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेबाबत ढवळाढवळ न करण्याचे निर्देश देखील मा.उच्च न्यायालयाने दिले आहेत अशी माहिती कायदेशीर सल्लागार ॲड.किरण पाटील यांनी दिली. यावेळी प्रा.अशोक पवार व खा शी मंडळाचे माजी सेक्रेटरी प्रा.सुनिल गरुड यांनी सविस्तर माहिती देऊन तक्रारदारांवर गंभीर आरोप केले.
दरम्यान १८ जून २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई – वाशीचे अध्यक्ष डॉ.श्रीराम पानझडे यांनी प्रताप ज्युनिअर कॉलेज अमळनेरच्या १८ उपशिक्षकांची मान्यता काढुन टाकण्याचे पत्र दिले होते. पत्र देण्या आधी संबंधीत अधिकाऱ्याने कोणतीही कारणे दाखवा नोटीस संबंधीत शिक्षकांना दिली नव्हती. या निर्णया विरोधात प्रताप कॉलेजच्या १७ शिक्षकांनी मा.हायकोर्ट खंडपीठ संभाजीनगर यांचे कडे धाव घेतली होती. दि. ४ जुले २०२४ च्या हायकोर्ट निर्णयात वरील बाबीचा उल्लेख आहे.
दरम्यान यावेळी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात प्रताप ज्युनिअर कॉलेज, अमळनेर येथे १८ शिक्षकांची नियमानुसार नियुक्ती दिनांक ५ जानेवारी२०१७ रोजी करण्यात आली होती. सर्व जागा अनुदानित सेवानिवृत्त शिक्षकांच्या होत्या, ७ वर्षापासुन सदर शिक्षक कार्यरत आहेत. रिट पिटीशन क्र. ११५६०/२०१७ नुसार २५ सप्टेंबर २०१७ च्या आदेशात शिक्षण उपसंचालक, नाशिक यांनी १८ शिक्षकांच्या मान्यतेबाबत निर्णय घ्यावा असे म्हटले होते. त्यानुसार शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी मान्यता दिली होती. १८ शिक्षकांचा शिक्षण सेवक कालावधी पुर्ण झाल्यावर प्रताप कॉलेजने कायम मान्यता दिली आहे. व मा.हायकोर्ट खंडपीठ संभाजीनगर यांनी शालार्थ प्रणाली प्रमाणे १८ शिक्षकांचे पगार करण्याचे आदेश दिले होते. याबाबत लोटन महारु चौधरी यांनी १८ उपशिक्षकांच्या विरुध्द रिट पिटीशन क्रमांक ९२९२/२०१८ व ९२८४/२०१८ या दोन्ही रिट याचिकेमध्ये १८ उपशिक्षकांच्या मान्यतेबाबत लोटन महारु चौधरी यांचे बाजुने किंवा उपशिक्षकांच्या विरुध्द कोणताही आदेश पारीत केला नाही. अशी वस्तुस्थिती असतांना ते अधिकाऱ्यांना व प्रसार माध्यमांना दिशाभूल करणारी खोटी माहिती सातत्याने देत आहेत. अधिकाऱ्यांवर दडपण आणून व आत्मदहनाची भीती दाखवुन चुकीचे आदेश करायाला भाग पाडतात. शिक्षकांची व संस्थेची बदनामी करतात सानेगुरुजींचे नाव वापरुन अमळनेरची व सानेगुरुजींची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्न लोटन चौधरी व दिलीप जैन करीत आहेत. ते जनहिताचे काम करीत नाही तर सुडाचे, व्देषाचे व स्वार्थाचे राजकारण करीत आहेत. त्यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रताप कॉलेज मधील २६ शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी यांनी केली आहे. तसेच लोटन चौधरी यांनी अमळनेर पोलीस स्टेशन ला प्रताप महाविदयालयातील १८ शिक्षकांच्या बाबतीत खोटी तक्रार केली होती. पंरतु पी. आय. अमळनेर यांनी सखोल चौकशी करुन त्यांचा अर्ज निकाली काढला आहे. २६ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना काढुन टाकण्याच्या खोट्या बातम्या देवून शिक्षण क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिलीप जैन व लोटन चौधरी करीत आहेत. सद्य परिस्थिती अशी आहे की, २६ पैकी एकही शिक्षकाला प्रताप कॉलेज मधुन शासनाने अगर खा.शि. मंडळाने निलंबित केलेले नाही. अमळनेर मध्ये शिक्षण क्षेत्रात अंसतोष निर्माण करणाऱ्या व शिक्षकांमध्ये दहशत व भिती निर्माण करणाऱ्या दिलीप जैन व लोटन चौधरी व अन्य अपप्रवृत्ती विरोधात राज्यव्यापी शिक्षक संघटना तिव्र आंदोलन करेल असा इशारा शिक्षकांनी दिला आहे. सदर पत्रावर शिक्षक नेते प्रा.अशोक पवार, कायदेशीर सल्लागार ॲड.किरण पाटील, शिक्षक प्रतिनिधी प्रा.स्वप्निल पवार व अमोल पाटील यांच्या सह्या आहेत. पत्रकार परिषदेस माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, खा.शी.मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, मराठा समाजाचे संचालक विक्रांत पाटील व भूषण भदाणे उपस्थित होते.
हे शिक्षक दहशतवादी आहेत काय?
यावेळी प्रा.अशोक पवार यांनी बोलताना हे शिक्षक पात्र होते म्हणूनच नोकरीला लागले असून संचालकांच्या राजकारणात यांचा विनाकारण बळी घेण्याचा प्रयत्न होत आहे, प्रत्यक्षात न्यायालयाच्या आदेशानेच यांचे पगार सुरू होऊन ती न्यायप्रविष्ट बाब असताना आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या कु - प्रवृत्तीच्या लोकांनी स्वतःच्या करिअरसाठी हा नवीन धंदा सुरू केला असून आशीर्वाद देण्याचा वयात ते शाप देत आहेत. प्रत्यक्षात दिलीप जैन यांच्या कार्यकाळात देखील भरती झाली असून त्याचेही पोस्ट मार्टम आम्ही करणार आहोत. यांना पैसा पाहिजे तर झोळी पसरवावी, यापध्दतीने ज्या ज्याठिकाणी अशी प्रवृत्ती शिक्षकांना त्रास देत असेल त्यांच्या विरोधात संघटना तयार करणार असून कुणीही घाबरून न जाता आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रा.अशोक पवार यांनी केले.
माजी आमदार व प्रा.पवारात जुंपली…
मलाही बोलू द्या असे माजी आ.डॉ.बी.एस पाटील यांनी सांगितल्यावर प्रा.अशोक पवारांनी यास विरोध केल्याने थोडा वाद होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र उपस्थितांनी दोघांची समजूत काढल्याने वाद शांत झाला.
प्रा. पवार यांचा गुंडप्रवृत्तीचा प्रकार:- डॉ. बी. एस. पाटील…
शिक्षकांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीसंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला मला बोलवण्यात आले होते. या वेळी शिक्षकांची बाजू मांडण्यासाठी मी उभा राहिलो असता प्रा. अशोक पवार जुन्या राजकारणाचा वचपा काढण्यासाठी अरेरावी करीत गैरवर्तन करून अंगावर धावून आले. लोकप्रतिनिधीवर धावून जाणे हा प्रा.पवार यांचा गुंडप्रवृत्तीचा प्रकार आहे. तर मी अन्याय झालेल्या शिक्षकांच्या बाजूनेच असून त्यांच्यासाठी कायम लढणार आहे.
-डॉ. बी.एस. पाटील, माजी आमदार