अमळनेर : चेन पुलिंग करत सुमारे अर्धा तास रेल्वे पॅसेंजर थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना १२ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
१२ रोजी अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची रांग लागली होती. भुसावळ हुन नंदुरबार जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी सुटली. रेल्वे मध्ये हजारो यात्रेकरू बसले. काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशन पूर्वी धार टेकडीच्या जवळ साखळी ओढल्याने रेल्वे जागेवर थांबली. हजारो यात्रेकरू त्याठिकाणी उतरले आणि काही समाज कंटकांनी रेल्वे वर दगडफेक केली. दगडफेक होताच अनेक प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गाडीत दगड येताच काही महिला आकांताने दादा खिडकी लावा म्हणून घाबरत घाबरत ओरडत होते. याबाबतचा हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. रेल्वे गार्डने रेल्वेतील बंदोबस्ताला असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना वारंवार साखळी ओढल्याच्या घटनेचे कळवले. मात्र दगडफेक झाल्याची माहिती नसल्याचे सहाययक पोलीस निरीक्षक राजकुमार यांनी सांगितले.