
टाकरखेडा येथे घडली घटना, ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी…
अमळनेर:- निकृष्ट दर्जाचे काँक्रीट गटारीवर टाकल्याने काँक्रीट तुटून गाय गटारीत पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी टाकरखेडा येथे घडली.
टाकरखेडा हे गाव बेटावद पाळधी या राज्य मार्ग सहा वर असून सार्वजनिक बांधकाम विभागाने गावातून जाणारा रस्ता व रस्त्याच्या बाजूला गटार आणि त्यावर काँक्रीटीकरण केले आहे. ग्रामस्थांच्या घरासमोरच काँक्रीटीकरण असल्याने त्यांची जनावरे आणि वाहने गटारीच्या काँक्रीट आवरणावरून न्यावी लागतात. मात्र ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. त्यामुळे अनेकदा काँक्रीट तुटून वाहनेही फसली आहेत. रस्त्याच्या कामाची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदारचे आहे तरीही बांधकाम विभागाने नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले आहे. १२ रोजी सायंकाळी जानकीराम महादू पाटील यांची गाय घरी येत असताना अचानक गटारीवरचे काँक्रीट तुटल्याने गाय गटारीत पडली. गाय गटारीत फसल्याने तिला बाहेर पडता येत नव्हते. अखेर गावकऱ्यांनी सळई कापून जेसीबी मशीन च्या साहाय्याने काँक्रीट तोडून गायीला बाहेर काढले. मात्र गाय गर्भवती असल्याने तिला मार लागून जीव गुदमरून तिचा मृत्यू झाला. जानकीराम पाटील याना लखवा झालेला असून गायीच्या दुधावर कुटुंबाची उपजीविका होत होती. गायीच्या मृत्यूने कुटुंबाला रडू कोसळले होते. तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात येऊन त्याच्याकडून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.




