अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथे २० वर्षीय तरुणाचा शेतात शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३१ रोजी दुपारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वावडे गावातील २० वर्षीय तरुण गौरव दीपक माळी हा शेतात कामानिमित्त गेला असता फवारणी करताना विहिरीवर लावलेल्या मोटारच्या वायरचा स्पर्श त्याच्या मानेला झाल्याने त्याला शॉक लागला. त्याचे वडील व गावातील लोकांनी त्याला उपचाराकामी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत.
कष्टाळू तरुणाच्या निधनाने गावावर पसरली शोककळा…
मृत तरुण गौरव हा धुळे येथे बीसीएचे शिक्षण घेत होता व सुट्टीवर घरी आलेला असता ही दुर्दैवी घटना घडली. त्याचे आईवडील हे शेतीकाम करत असून मुलाच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनमिळावू स्वभावाच्या गौरवच्या अकस्मात निधनाने गावावर ही शोककळा पसरली आहे.