
अमळनेर : शॉर्ट पॅन्ट वर स्मारकाजवळ झोपत जाऊ नको असे बोलण्याचा राग आल्याने एका गुंडाने भोई समाज मढी च्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना ३० रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे.
३० रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास विशाल दशरथ चौधरी रा भोईवाडा हा भोई समाज पंचमंडळ मढी जवळ असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज स्मारकावर शॉर्ट पॅन्ट वर झोपला होता. तेथून महिला येत जात असल्याने दीपक शांताराम भोई , रवींद्र रतन भोई , सागर बुधा भोई ,प्रवीण पंडित भोई ,राजमल शांताराम शिंगाणे यांनी त्याला शॉर्ट पॅन्ट वर झोपू नको म्हणून सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने बाजूला असलेल्या मोटरसायकल मधील पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत काढून ते मढी च्या दरवाजाच्या लाकडी पाट्यांवर टाकून पेटवून दिले. तेथील उपस्थितांनी आग विझवली. यापूर्वी देखील विशाल ला याबाबत हटकले होते तेव्हा मी गावचा दादा आहे तुंमच्याने जे होईल ते करून घ्या असा दम दिला होता. दीपक याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला विशाल चौधरी विरुद्ध भारतीय न्याय संहिता ३२६ जी , ३५२ ,३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या पथकाने आरोपी विशाल याला तातडीने अटक केली असून न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीला जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध गेल्या वर्षी एमपीडीए कारवाई करण्यात आली होती.




