
अमळनेर : सतत पडणाऱ्या पावसाने ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने तीन डेंग्यूचे तर दोन विषारी मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याने शहरात आरोग्याची भीती निर्माण झाली आहे. नगरपालिकेतर्फे सर्वे करण्यात येत आहे.
शहरात सर्वत्र पाणी साचून राहत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. पिंपळे रोडवरील एक तरुणी आणि गांधलीपुरा भागातील दोन बालिकाना व बंगाली फाईल भागात एकाला अशा चार जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तसेच भोई वाडा आणि ख्वाजा नगर भागात दोन जणांना विषारी मलेरियाची लागण झाली आहे.
नगरपालिकेने शहरात आरोग्यसेविका आणि आशा स्वयंसेविका यांचे सहा पथके सर्वे साठी नियुक्त केले आहेत. दररोज घरोघरी जाऊन पथके घरातील पाण्याच्या टाक्या , फ्रिजचे मागील भांडे , डबके , कुंड्या ,टायर तपासून घेत आहेत. मोठे तलाव विहिरी यात गप्पी मासे सोडले जात आहेत. तसेच टाक्यांमध्ये ऍबेट टाकण्यात येत आहे. पथकांनी ५०२ लोकसंख्येची १२० घरे तपासली. त्यात ४६३ कंटेनर तपासले १६ दूषित आढळले १६ रिकामे करण्यात आले. रुग्ण आढळलेल्या भागात फवारणी , धुरळणी ,कीटक नाशक टाकण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयात देखील लहान मुलांची संख्या वाढली आहे.
नागरिकांनी उघड्यावर पडलेले भांडे रिकामे करावे. ताप आल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे. गवत असलेल्या ठिकाणी डबके किंवा पाणी साचलेल्या ठिकाणी लहान मुलांना जाऊ देणे टाळावे. – डॉ विलास महाजन , मुख्य वैद्यकीय अधिकारी ,नगरपालिका रुग्णालय
आरोग्य विभागाला स्वच्छता साफसफाई तसेच ऑइल ,धुरळणी , फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. – तुषार नेरकर ,मुख्याधिकारी अमळनेर नगरपालिका




