
ते पुढच्या विधानसभेला निवडून आलेले दिसणार नाहीत, वक्तव्याची पुन्हा चर्चा…
अमळनेर:- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे सोमवारी अमळनेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला येत आहे. मात्र त्यांचे स्वागत हे शरद पवार राष्ट्रवादीकडून ‘ते (अनिल दादा) पुढच्या विधानसभेला निवडून आलेले दिसणार नाहीत.. याची आम्ही काळजी घेऊ.. ’ या शरद पवारांच्या वक्तव्याच्या बॅनरने होणार आहे. त्यामुळे शहरात राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसापासून अमळनेर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आपली आमदारकी शाबूत ठेवण्यासाठी मंत्री अनिल पाटील जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी माजी आमदार साहेबराव दादा पाटील यांना गळाला लावले आहे. मात्र शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसत मंत्रीपद मिळवणारे अनिल पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य नागरिक आणि शरद पवारांची राष्ट्रवादी विसरलेली नाही. तर खुद्द शरद पवार यांनी ” ते (अनिल दादा) पुढच्या विधानसभेला निवडून येणार नाहीत.. याची आम्ही काळजी घेऊ…! ” असे विधान करून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. त्याची आठवण आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादा यांनाही या बॅनरच्या रुपाने अमळनेरात करून देण्यात येणार आहे. अमळनेर शहरातील चौकाचौकात हे बॅनर लागले असल्याने त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या बॅनरवर तुतारीचे चिन्ह असल्याने जणू ते तुतारी फुंकून मंत्री अनिल पाटील यांनी खुद्द शरद पवारांच्या विषयी केलेल्या चुकीच्या विधानाचा बदला घेणार आहेत. असे या बॅनरवरून भासत आहे. त्यामुळे सोमवारी अजित पवारांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाला हे बॅनर एका अर्थाने निवडणुकी आधीच सुरुंग लावत आहेत. त्यामुळे अनिल पाटील यांचे मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन..चे स्वप्न धुळीस मिळेल, असा आत्मविश्वास शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे श्याम जयवंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.




