
नाशिक येथे कामासाठी जाणाऱ्या प्रवाश्यांची झाली सोय
अमळनेर-नाशिक येथुन अमळनेरसाठी रात्री 9 वाजता अमळनेर आगारातर्फे एस. टी. बससेवा सुरू करण्यात आल्याने नाशिक येथे कामासाठी जाणाऱ्या प्रवाश्यांची मोठी सोय झाली आहे.
यासंदर्भात अमळनेर येथे प्रवासी राजा दिन कार्यक्रमात काही पत्रकार बांधव आणि प्रवासी बांधवानी समस्या मांडल्याने विभागीय नियंत्रक श्री जननोर यांनी तात्काळ ही बस सुरू करण्याचे आदेश दिल्याने सोमवार दि.12 पासून सदर बससेवा नियमित सुरू झाल्याची माहिती अमळनेर आगार व्यवस्थापक श्री चौधरी यांनी दिली आहे.एस महामंडळाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ही बस अमळनेर आगारातून दुपारी 4 वाजता निघून धुळे,मालेगाव,चांदवड,पिंपळगाव मार्गे रात्री 8.30 वाजता नाशिक येथे पोहोचेल तर नाशिक येथून त्याच दिवशी रात्री 9 वाजता तेथून निघून त्याच मार्गाने धुळे येथे रात्री 12.40 ला तर अमळनेर येथे रात्री 1.30 वाजता पोहोचणार आहे.
दरम्यान शिक्षण, महसूल,कृषी,वैद्यकीय यासह अनेक शासकीय स्तरावरील विभागीय कार्यालय नाशिक येथे असल्याने अमळनेर येथून अनेक जण कामानिमित्त नाशिक येथे नियमित जात असतात दिवसभर कामकाज आटोपल्यावर त्यांना नाशिक येथून थेट अमळनेर येण्यासाठी बस नसल्याने ते धुळ्या पर्यंत पोहोचून तेथून पुन्हा पुढची बस किंवा टॅक्सी ने अमळनेर यावे लागत होते.मात्र आता रात्री 9 वाजता थेट अमळनेर बस असल्याने दिवसभरात सर्व कामकाज आटोपून आरामात घरी परतता येणार आहे.यामुळे सदर बसचे अनेकांनी स्वागत केले आहे.तर जास्तीतजास्त प्रवाश्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अमळनेर आगारातर्फे करण्यात आले आहे.




