
पावसाने उघडीप दिल्याने एकाचवेळी कामे सुरू झाल्याने मजुरांची टंचाई
अमळनेर : गेला महिनाभर सतत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना शेतात काम करता येत नव्हते मात्र आता कुठे सुर्यनारायणाने दर्शन देणे सुरू केल्याने शेतांमध्ये एकाचवेळी कामाची लगबग सुरू झाली. मजुरांच्या कमतरतेमुळे मध्यप्रदेशातील जामन्या येथून सुमारे १२० किमी वरून मजूर आणले जात आहेत.
अमळनेर तालुक्यात २१ ऑगस्ट पर्यंत ८८.५३ टक्के म्हणजे ५९७.६४ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या आठ दिवसांचा खंड सोडला तर तालुक्यात सतत पाऊस पडत होता. शेतजमीन कोरडी होत नसल्याने मोठ्या प्रमाणात तण वाढले होते. कोळपणी किंवा निंदणी करता येत नव्हती. जशी पावसाची उघडीप झाली तशी शेतातल्या कामांसाठी घाई लागली. उडीद मूग पिके काढणीला आले आहेत. तर कापूस व मका पिकातील गवत तण वाढले आहे. मात्र एकाचवेळी सर्वांची कामे सुरू झाल्याने मजुरांची कमतरता भासू लागली. तसेच लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रे जमा करण्यात, त्रुटी पूर्ण करण्यात अनेक गरजू महिला गुंतल्याने मजुरीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. म्हणून शेतकऱ्यांना मध्यप्रदेशातून आदिवासी पावरा समाजाचे मजूर आणावे लागत आहेत. सुमारे १२० किमी अंतरावरून पीक अप व्हॅन किंवा मोठ्या वाहनात मजूर आणले जात आहेत.
स्थानिक मजुरांना ३००ते ३५० रुपये मजुरी द्यावी लागते. मुकादमाला मजुरामागे २० रुपये कमिशन द्यावे लागते. स्थानिक मजूर सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत काम करतात. मध्यप्रदेशातील मजुरांना २६० रुपये मजुरी द्यावी लागते. ते सकाळी दहा वाजता कामाला सुरुवात करून दुपारी चार वाजेपर्यंत काम करतात. त्यामुळे कमी मजुरीत जादा काम होत असल्याने मध्यप्रदेशातील मजूर परवडत असल्याचे वावड्याचे शेतकरी किशोर पाटील यांनी सांगितले.




