
लोण खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल…
अमळनेर:- लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वाटप न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी तालुक्यातील लोण खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदार रमणबाई प्रल्हाद पाटील हिच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोण खुर्द येथील देवचंद सहादू भिल व इतर ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानदार क्रमांक ७२ च्या संचालक रमणबाई प्रल्हाद पाटील हे धान्य वाटपात अनियमितता करीत असल्याची तक्रार तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे २७ मे रोजी केली होती. तहसीलदारांनी पुरवठा निरीक्षक निंबा मालजी जाधव यांना दिल्याने त्यांनी १८ जुलै रोजी लाभार्थ्यांचे जाबजबाब घेतला तेव्हा लाभार्थ्यांनी महिनाभरापासून धान्य मिळाले नसल्याची तक्रार केली. त्यांनतर दुकानाची तपासणी केली असता दुकानदाराने रेशन कार्ड धारकांना धान्य दिले नसल्याचे उघड झाले. १० हजार २७ रुपयांचा १० क्विंटल १ किलो गहू , ५२ हजार ८०६ रुपयांचा १३ क्विंटल ५४ किलो तांदूळ असे एकूण ६२ हजार ८३३ रुपयांचे जून महिन्याचे धान्य वाटप करून ते जुलै महिन्याचे दर्शवून त्या धान्याची परस्पर विल्हेवाट लावली. म्हणून पुरवठा निरीक्षक निंबा जाधव यांनी मारवड पोलीस स्टेशनला जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.




