
हजारो भाविकांना मिळणार लाभ,मोठ्या श्रद्धेने वाढतेय मंदिराचे नावलौकिक
अमळनेर-तालुक्यातील चांदणी कुर्हे गावाजवळ रेल्वे रुळाच्या मधोमध असलेल्या ग्रामदैवत सती मातेच्या मंदिरात आज शुक्रवार दि 23 ऑगस्ट रोजी सार्वजनिक भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे.
सकाळी 11 वाजेपासून सती माता मंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून अमळनेरसह परिसरातील सर्व भाविक भक्तांनी, समाजबांधव, पदाधिकारी यांनी आवर्जून महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती कुर्हे बु व खुर्द येथील गावकरी व मातेच्या भक्तानी केली आहे.तसेच सकाळी 7 ते 9 या वेळेत होम पूजन होणार आहे.
दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या सती माता मंदिराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या श्रद्धेने वाढत असून आता अमळनेर च नव्हे तर जिल्हा व पर जिल्ह्यातून देखील भाविक मोठ्या श्रद्धने येऊ लागले आहेत.अमळनेर धरणगाव मार्गावर हे मंदिर असल्याने येथून जाणारा प्रत्येक भाविक दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. गेल्या काही वर्षात काही सुविधा देखील मंदिरावर झाल्या असून दररोज भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते,शुक्रवार हा देवीचा वार असल्याने या दिवशी दर्शनासाठी दिवसभर रांग लागत असते, विशेष म्हणजे अनेक भाविक याठिकाणी नवस मानून त्यांची मनोकामना पूर्ण होत असल्याने नवसही फेडत असतात त्यामुळे वर्षभर मातेच्या मंदिर परिसरात लहान मोठे भंडारे सुरूच असतात.देवीला घंटा भेट देण्याची प्रथा असल्याने मोठ्या प्रमाणात लहान मोठे पितळी घंटे येथे जमा होत असतात.रेल्वे रुळाच्या मधोमध मंदिर असताना देवीच्या कृपेने आजपर्यंत एकही अपघाताची घटना घडली नाही हे विशेष आहे.रेल्वे प्रशासन देखील हे मंदिर हटविण्यात हतबल ठरले अशी आख्यायिका मंदिराची असून त्यामुळे रेल्वे रुळावर असलेले भारतातील हे एकमेव मंदिर असावे
मंदिराचे कामकाज कुर्हे येथील विश्वस्त मंडळ सांभाळत असून याठिकाणी सुशोभीकरण सह रंगरंगोटी, वृक्षारोपण, बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.निसर्गरम्य व थंडगार वातावरण असल्याने आलेला भाविक किमान 10 मिनिटं तरी थांबल्याशिवाय राहत नाही.सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.आतापर्यंत सती मातेचा फोटो उपलब्ध नसतांना मातेचा पहिला फोटो निस्सीम माता भक्त तथा प्रताप महाविद्यालयाचे कर्मचारी महेश राजपूत यांनी फोटोग्राफर महेंद्र पाटील यांच्या मदतीने साकारला असून मातेचे फोटो कधीच विकले जाऊ नये अशी त्यांची मनोकामना असल्याने त्यांनी भाविकांच्या मदतीने शेकडो फोटो निर्माण करून श्रद्धेने मागणीनुसार घराघरात पोहोचविले आहेत,यामुळे आज स्थितीत अमळनेर येथील अनेकांच्या घरात अतिशय मातेचे फोटो लागले आहेत. मंदिरात एकच सेवेकरी व पुजारी असून तेच मंदिरात पूजा अर्चा व निगाही राखत असतात. याठिकाणी फक्त मातेचे दर्शन,नवस आणि नवस फेड याच गोष्टीना प्राधान्य दिले जात असल्याने इतर गोष्टीना इथे थारा दिला जात नाही.
एकंदरीत मंदिराचे वाढते प्रस्थ लक्षात घेता भविष्यात हे मंदिर अतिशय श्रद्धेने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारत भर प्रचलित होईल असेच चित्र दिसत असून यासाठी स्थानिक व जिल्हा भारतातील लोकप्रतिनिधीनी व रेल्वे प्रशासनाने देखील याठिकाणी सोई व सुविधा उपलब्ध करण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा भाविकांची आहे.




