
अमळनेर:- शहरासह ग्रामीण भागात देखील डेंग्यूने तालुक्यातील आठ जणांना ग्रासले असून नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. पालिकेने १२ पथकांची नियुक्ती केली आहे. ४९६ घरात १५२३ कंटेनर तपासण्यात आले आहेत. पैकी २४ कंटेनर मध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
मध्यंतरीचे आठ दहा दिवस सोडले तर पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचे डबके साचणे सुरू झाले आहे. साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढली आहे. शहरातील द्वारका नगर , मंगलादेवी चौक , वर्धमान नगर , राधाकृष्ण नगर , जोशींपुरा , आदर्श नगर असे शहरातील सहा तर दगडी सबसगव्हान, मुडी येथील ग्रामीण भागातील दोन असे एकूण आठ रुग्ण डेंग्यूसदृश्य आढळून आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत.
जळगाव जिल्हयात डेंग्यूची चाचणी साठी सुविधा नसल्याने धुळे येथे चाचणी करण्यात येत होती. मात्र धुळे येथील साहित्य चोरीला गेल्याने धुळ्याला देखील डेंग्यू चाचणी होत नाही. त्यामुळे आता अमळनेरच्या आरोग्य विभागाला नंदुरबार येथे डेंग्यू चाचणीसाठी नमुने पाठवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे आधी धुळ्याला पाठवून धुळ्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्फत नंदुरबार नमुने जातात. नाहीतर छ. संभाजीनगर येथे नमुने पाठवावे लागतात.
दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशाने डॉ विलास महाजन यांनी १२ पथकांची नियुक्ती केली आहे. स्वच्छ पाण्याचे डबके, भांडी, टायर, फ्रीज, पाण्याच्या टाक्या तपासून त्यात ऍबेट तर डबक्यात काळे ऑइल, धुरळणी ,फवारणी करण्यात येत आहे.
पिंपळे रोड परिसरात रुग्णांची संख्या जास्त असल्याने या भागातील रिकामे प्लॉट मधील पाणी नष्ट करून पालिकेने प्लॉट मालकाकडून दंड वसूल करावा अशी मागणी होत आहे.




