
अमळनेर : महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवले आहे की गद्दाराचा जो पराभव करू शकेल तो आपला उमेदवार असेल. त्यामुळे उमेदवार कोणीही असला तरी महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी अमळनेर येथे मराठा मंगल कार्यालयात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून केले.
अमळनेर ही लढणाऱ्यांची पवित्र भूमी आहे. या तुळशीच्या वृंदावनात भांगेची रोपटी निपजली आहेत ती उपटून फेकली पाहिजे. महाराष्ट्रातील एकही गद्दार विधानसभेत दिसणार नाही. मोदी आणि शहा या गुजरात्यानी महाराष्ट्रातील मराठी माणसाचा रोजगार गुजरातला हिसकावून नेला आहे. मुंबई तोडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.मोदी शहा यांनी ४०० पार केले असते तर घटना जाळून टाकली असती. मात्र महाराष्ट्राने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. मराठी माणूस पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही हे मोदी आणि शहानी लक्षात ठेवावे. शरद पवार यांच्या झेड सुरक्षेबद्दल ते म्हणाले की, दिल्लीहून पवारांना सुरक्षा पुरवली जाते याचा अर्थ महाराष्ट्राचे गृहमंत्री कुचकामी आहेत. फडणवीस यांनी राजीनामा द्यावा तो आगलाव्या माणूस आहे. नंबर एकचा महाराष्ट्र आज १५ व्या क्रमांकावर देखील नाही म्हणून राज्य वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड ललिता पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी बालिकांवरील अत्याचाराचा समाचार घेतला. अशा नराधमांना आमच्या महिलांच्या ताब्यात द्या आम्ही ऑन दि स्पॉट न्याय मिळवू असे संतप्त आव्हान देखील त्यांनी केले.
सुरूवातीला पैलाड येथे संजय राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण व वंदन करण्यात आले. त्यांनतर बाजार समितीच्या समोर श्रीकांत पाटील यांच्या शिवसेना तालुका संपर्क कार्यालयाचे उदघाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर ऍड ललिता पाटील, शुभांगी पाटील, अस्मिता पाटील, महानंदा पाटील, विष्णू भंगाळे,भगवान करनकाळ, तालुका प्रमुख श्रीकांत पाटील ,चंद्रशेखर भावसार , नितीन निळे ,नाना ठाकूर , पराग पाटील, साहेबराव पवार , विजय पाटील, माजी आमदार डॉ बी एस पाटील , तिलोत्तमा पाटील , डॉ अनिल शिंदे , उमेश पाटील ,श्याम पाटील ,प्रशांत निकम , मनीषा परब ,निंबा पाटील,देवेंद्र देशमुख यांच्यासह हजर होते. सूत्रसंचालन व आभार चंद्रशेखर भावसार यांनी केले.




