
अमळनेर : अमळगावच्या तिन्ही जिवलग मित्रांनी एकाच दिवशी पोलीस प्रशिक्षणामधून पास आऊट करत कष्टाचे चीज केले आहे.
निलेश बुधा कुंभार , जयवंत संजय कुंभार आणि सौरभ गुलाबराव कोळी तिघेही अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील रहिवासी असून घरात अठरा विश्वे दारिद्र्य होते म्हणून निलेश आणि जयवंत लहान पणापासूनच आपल्या आई वडिलांसोबत गुजरातला विटा छापायला जायचे. वर्षभरातील सहा आठ महिने गुजरातला जायचे आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा शाळेत यायचे. निलेशचे आई वडील अशिक्षित आणि परिस्थिती मुळे मोठा भाऊ आणि बहीण देखील अशिक्षित राहिली. तर जयवंत याचे देखील एकत्र कुटुंब , आजोबा चार पाच इयत्ता शिकलेले मात्र आई वडील अशिक्षित आहेत. निलेश आणि जयवंत यांनी दहा पंधरा वर्षे विटा छापण्यात घालवली. त्यांच्या सोबत त्यांचा मित्र सौरभ याचीही परिस्थिती बिकट होती म्हणून त्याचेही आई वडील शेतमजुरी करत होते. म्हणून तोही कधी शाळा बुडवून शेतात जात होता. मात्र लहानपणापासून तिन्ही मित्रांची मैत्री पक्की होती. परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि स्वतःच्या आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घ्यायला सुरुवात केली. तिघांनी १२ वी सोबत केली , प्रताप महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. शालेय जीवनापासून खेळायची देखील आवड होती. तिघेही खोखो च्या संघात होते. तिघांनी भूगोल विषयातच पदवी घेतली ,तिघांनी महाविद्यालयीन काळात एन सी सी घेतले. तेथे त्यांना डॉ प्रमोद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. खाकी वर्दीतील रुबाब आणि शिस्त ,प्रामाणिकपणा , देशभक्ती त्यांना भावली. तिघांनी एकत्रच मैदानी सराव सुरू केला. स्पर्धा परीक्षेच्या सरावासाठी अमळनेर ला भाड्याने खोली केली. एकमेकांना प्रश्न समजावून, चुका दुरुस्ती करून तिघांनी आपले प्रगतीपुस्तक भरले. पोलीस भरतीसाठी एकाच वेळी अर्ज केला ,तिघेही पास झाले , आणि एकाचवेळी प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी पोलीस दलात मुंबई येथे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला हजर झाले.
लहानपणापासून हे तिघे सोबत असले तरी त्यांना १२ वी पासून त्यांना बुधगाव चा नयन ज्ञानेश्वर सोनवणे व ढेकू चा हृतिकेश विलास पाटील हे दोन मित्र भेटले त्यांनीही भूगोल विषयात पदवी घेतली आणि तेही एनसीसी ला सोबत होते. ते दोघे सैन्यदलात भरती झाले. पाच जिद्दी मित्रांनी हाताच्या बोटांप्रमाणे प्रयत्नांची मूठ आवळली आणि यशस्वी झाले. प्रताप महाविद्यालयाचे चेअरमन डॉ संदेश गुजराथी , प्राचार्य डॉ ए बी जैन आणि प्रा डॉ प्रमोद चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.




