
अमळनेर : तालुक्यातील बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या रुबाजीनगर ते हिंगोणे गावादरम्यान बंधाऱ्याला भगदाड पडल्याने पाणी वाहून जात आहे. सिंचनावर याचे परिणाम होणार आहेत. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अमळनेर तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बोरी नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत. रुबजी नगर वस्तीच्या पुढे आणि हिंगोणे गावाच्या अलीकडे मे महिन्यात बंधारा बांधण्यात आला. मात्र पहिल्याच पुरात बंधाऱ्याच्या पश्चिमेला एका कोपऱ्याला भगदाड पडल्याने नदीला आलेले पाणी वाहून जात आहे. नदीचा पूर ओसरल्यावर जो पाणीसाठा याठिकाणी होणार होता तो बंधाऱ्यांमुळे वाहून जाणार आहे. परिणामी सिंचन क्षमता कमी होऊन शेती व्यवसायावर परिणाम होतील त्यातल्या त्यात आजूबाजूला पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते.
निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप शिवाजी पाटील यांच्यासह काही नागरिकांनी केला आहे तर वाळू चोरीमुळे खड्डा पडल्याने हा प्रकार घडल्याचे अधिकारी सांगत आहेत. एकंदरीत गैरकामामुळेच बंधाऱ्याचे नुकसान झाल्याचे उघड आहे.
दरम्यान घटनास्थळी कमरे इतक्या पाण्यातून सुद्धा वाळू काढली जात असल्याचे दिसून येते. अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने बंधारा फुटला असेल तर यावर्षी देखील त्यात पाणी साठणार नाही म्हणजे विहिरीची पाणी पातळी वाढण्यास कृत्रिम बाधा निर्माण झाली आहे.
घटनास्थळी पुष्पा परदेशी , पियुष माळोदे या दोन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीला पाठवले. त्या ठिकाणी वाळू चोरांनी वाळू खोदल्याने पाया खालील भाग मोकळा झाला म्हणून बंधाऱ्याला भगदाड पडले असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बंधाऱ्याची किंमत एक कोटी दोन लाख रुपये असून कंत्राटदाराला फक्त २५ टक्के रक्कम अदा केली आहे. त्याच्याकडून पूर्ण काम करून घेतल्याशिवाय बिल अदा होणार नाही.- बाळकृष्ण ढंगारे उपविभागीय अभियंता मृदसंधारण विभाग चोपडा
अवघ्या चार ते पाच महिन्यात बंधाऱ्याला भगदाड पडले आहे. कामाची गुणवत्ता आणि साहित्याचा दर्जा याची तपासणी व चौकशी झाली पाहिजे.- शिवाजी दौलत पाटील , शेतकरी संघटना




