दगडी दरवाज्याजवळ भव्य मंचावरून होणार मिरवणुकांचे स्वागत
अमळनेर-शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून वेळेच्या आत गणेश विसर्जन करणाऱ्या आदर्श मंडळांचा यंदाही “श्री सन्मान” होणार असून दगडी दरवाज्याजवळ भव्य मंचावरून येणाऱ्या सर्व मिरवणुकांचे अनोखे स्वागत केले जाणार आहे.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, मुंदडा फाऊंडेशन, अमळनेर,अमळनेर पोलीस स्टेशन,अमळनेर नगरपरिषद आणि महसूल विभाग अमळनेर आदींच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.गेल्या वर्षी देखील हा उपक्रम राबविला असता सर्व मंडळांनी भरभरून दाद देत या मंचावरून होणाऱ्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केले परिणामी कोणताही गोंधळ न होता सर्व मिरवणूक शांततेत पार पडल्या तसेच आदर्श गणेश मंडळाचा व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या हिंदू मुस्लिम कार्यकर्त्यांचा देखील ट्रॉफी व नारळ देऊन सन्मान झाल्याने त्यांचाही उत्साह वाढला होता.
मागील वर्षाचा चांगला अनुभव पाहता पत्रकार संघ आणि मुंदडा फाऊंडेशन यांनी यावर्षी देखील पुढाकार घेतल्याने पोलिस विभाग,नगरपरिषद आणि महसूल विभाग या सर्वांनी यात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे.
अनंत चतुर्दशीला दि 17 सप्टेंबर रोजी दगडी दरवाजा जवळ उभारण्यात येणाऱ्या मंचावरून सायंकाळी 6 वाजेपासून मंडळाना श्री सन्मान ट्रॉफी व नारळ देऊन सन्मानित केले जाणार आहे.याशिवाय सातव्या व नवव्या दिवशी विसर्जन करणारे आदर्श मंडळ आणि हिंदू मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी वर्गालाही येथे सन्मानित केले जाणार आहे.यावेळी सर्व स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व गणेश मंडळांनी शिस्तीने व वेळेच्या आत विसर्जन मिरवणुक काढून श्री सन्मानाचे मानकरी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.