
मुलीचा मृत्यू, पळून जाणाऱ्या चालकाला गावकऱ्यांनी पकडले
अमळनेर:- तालुक्यातील चौबारी जवळ पाडसे रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने आठ वर्षीय मुलीला धडक दिल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पळून जाणाऱ्या चालकाला गावकऱ्यांनी पकडत चोप देवून मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले.
२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास संगीता विजय नाईक ह्या आपली मुलगी रेखमा विजय नाईक (वय ८) हिच्यासोबत पाडसे रस्त्याच्या कडेने विहिरीवर पाणी भरण्यास जात होते. त्यावेळी पाडसे कडून चौबारीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने (क्रमांक एमएच ०२ बीजे ५४२०) भरधाव वेगाने जात रेखमा हिला धडक दिली. व सदर वाहनचालक अमळनेरच्या दिशेने पळून गेला. मुलीचे वडील विजय नाईक व ग्रामस्थांनी मुलीकडे धाव घेत तिला खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सदर घटनेप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.
ग्रामस्थांनी धाव घेत आरोपी वाहनचालकाला दिला चोप…
दुर्घटना झाल्याचे व चालक पळून गेल्याचे कळताच काही ग्रामस्थांनी अमळनेरकडे धाव घेतली. व सदर वाहनचालकाला पकडत चोप दिला. यावेळी मारवड पोलिसांनी सदर चालकास व वाहनाला ताब्यात घेतले असून विकास प्रकाश वानखेडे (वय २५, रा. भालेगाव ता. मलकापूर जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला काल अमळनेर सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.




