
सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.संजय कळमकर यांचे प्रतिपादन…
अमळनेर:-जुन्या काळात मनोरंजनाची साधने मर्यादित होती मात्र सर्वसामान्य माणूस आनंदी होता,आज मनोरंजनाची साधने अमर्याद असून व्यक्ती संकुचित आणि चिडचिडा होत चालला आहे, प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.संजय कळमकर यांनी केले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठी वांड:मय मंडळ व आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्यातर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर डॉ.कळमकर बोलत होते. नर्मदा फाऊंडेशन चे हृदयरोग तज्ञ डॉ.संदीप जोशी व स्त्रीरोग तज्ञ डॉ.मयुरी जोशी हे प्रमुख पाहुणे होते.व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी,उद्योजक अजय केले,संदीप घोरपडे आदी होते.
यावेळी डॉ.कळमकर यांनी बोलतांना सांगितले की, जगाच्या १४८ देशांत आनंदी निर्देशांक (happiness index) च्या आधारावर सर्व्हे करण्यात आला असून त्यात भारताचा नंबर १२८ वा असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली,भारतीयांना असलेला आनंद देखील उपभोगता येत नसून धर्म,जात,पंथ यातच भारतीय समाज गुंतून पडलेला आहे.
जुनी लोक चुकांमधे आनंद शोधायची तर आता आनंदात ही चुका शोधल्या जातात. ब्रेकिंग न्युज च्या नावाखाली खोट्या बातम्या पसरविण्यावर भर दिला जात आहे.माणसे मोबाईल च्या आभासी जगात जगायला लागली असून यात वेदना आणि संवेदना हरवत चालल्या असल्याचे त्यांनी सांगितले.सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांचे आणि मुलांचे नाते पोरके होत असून, घरातून मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे वास्तव स्वीकारले पाहिजे.
घरात पैसा किती यापेक्षा पुस्तके किती यावर भर दिला पाहिजे.मुलांवर अपेक्षा लादू नका जास्त अपेक्षा लादल्याने मुल कोट्यात् जाऊन आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.
आम्हाला शिकवू द्या या कामासाठी शिक्षकांना मोर्चा काढावा लागत असून आपली शिक्षणपद्धती काळानुरूप बदलली पाहिजे.१६ वर्षापर्यंत मुलांच्या आयुष्यात जी जडणघडण केली जाते ती निरंतर चालत असते.सायंकाळी टिव्ही वरील चालत असलेल्या सिरियल मुळे मुलांची आई हरवत चालली आहे.आईचे मुलांकडे लक्ष नसून त्या टिव्ही मुळे घरातील संवेदना हरवत चालल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन स्नेहा एकतारे यांनी केले तर आभार बन्सीलाल भागवत यांनी मानले.




