
अमळनेर:- शहरातील रहिवासी व आरोग्य सेविका सुवर्णा कौतिक धनगर यांना मा.आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते मौलाना अब्दुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद ता.रावेर यांच्यातर्फे हा आदर्श आरोग्य सेविका पुरस्कार देण्यात आला.
श्रीमती सुवर्णा कौतिक धनगर ह्या अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड ता.अमळनेर या ठिकाणी कार्यरत होत्या तेथेही त्यांनी दोन जुळ बाळांची प्रसूती यशस्वीरित्या केलेली होती. मारवड पंचक्रोशीतील सर्वांना त्या सर्वश्रुत आहेत.
मागील तीन वर्षापासून त्यांची प्रशासकीय बदली होऊन सध्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड ता.चोपडा या ठिकाणी कार्यरत आहेत. कोरोना काळातील त्यांचे उत्कृष्ट काम म्हणून त्यांना अनेक संस्थांनी कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले.
किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबिन टेस्ट करणे त्यांना उपचार देणे, ग्रामीण भागातील मुला मुलींना आहाराविषयी स्वच्छतेविषयी महत्त्व पटवून देणे, गरोदर मातांना परिपूर्ण सेवा देणे, शेत शिवारात लसीकरण करणे, आदिवासी भागातील पालकांना लसीकरणाचे योग्य असे मार्गदर्शन करून लसीकरण संदर्भात लसीचे महत्त्व पटवून देणे, पंतप्रधान मातृत्व वंदना योजना बाबत मातांचे समुपदेशन करणे, अंगणवाडीतील मुलांना आर्यन सिरप देणे, जंतनाशक गोळ्या देणे, शाळेतील मुलांना डीपीटी बूस्टर डीटी लसीकरण करणे, पल्स पोलिओ मोहीम आदिवासी भागातील ग्रामीण मुलांना राबवून पल्स पोलिओचे डोस देणे, कुष्ठरोग रुग्णांची तपासणी करणे व त्यांच्यावर उपचार करणे, तसेच क्षयरोग रुग्णांची तपासणी करणे व त्यांच्यावर उपचार करणे, बेटी बचाव बेटी पढाव मोहिमेची जनजागृती करणे. ग्रामसभा, गटसभा द्वारे आरोग्य शिक्षणाचा प्रसार करणे व जनजागृती करणे, अतिजोखमीच्या मातेला घरी जाऊन सेवा देणे या आणि अशा अनेक प्रकारच्या आरोग्यसेवा त्या आदिवासी भागातील माता पालकांना मुला मुलींना देत आहेत. आणि म्हणून अशा उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सन्मान समाजाकडून नेहमीच होत असतो.
म्हणून हा आदर्श आरोग्य सेविका पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाल्याने समाजातून सुद्धा त्यांच्याबद्दलच्या चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या अगोदर सुद्धा त्यांना मराठी सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते खांन्देशियन ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
श्रीमती सुवर्णा कौतिक धनगर ह्या आनंदा बापू धनगर (माध्य. शिक्षक, करणखेडा हायस्कूल) यांच्या धर्मपत्नी आहेत.

