
शेतकऱ्याचा मका व ट्रॅक्टरचे झाले मोठे नुकसान…
अमळनेर:- भुयारी गटारीच्या चारीत चाक जाऊन ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची घटना ११ रोजी सायंकाळी ढेकू रोडवर घडली.
चोपडा तालुक्यातील वाळकी येथील पांडुरंग शामराव धिवरे यांनी आपला मका विकण्यासाठी अमळनेर बाजार समितीत आणला होता. तेथून ढेकू रोडवरील जीन मध्ये ट्रॅक्टर नेत असताना ढेकू रोडवर भुयारी गटारीसाठी खोदलेल्या चारीत चाक फासून ट्रॅक्टर पलटी झाले. त्यामुळे ट्रॅक्टरमधील मका खाली पडला. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
भुयारी गटारीचे खड्डे खोदल्यावर ते नीट बुजले गेले नाहीत. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने खड्डयातील माती खाली खचत आहे. आतापर्यंत याच रस्त्यावर आठ ते दहा मोठी वाहने फसली आहेत तर लहान वाहने व दुचाकी देखील फसल्या आहेत. जीवन प्राधिकरण विभाग आणि ठेकेदार पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना हाल सोसावे लागत आहे. जाड खडी व मुरूम टाकून खड्डे बुजवावेत आणि त्यावर रोलर फिरवावे म्हणजे खड्डे खचणार नाहीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




