
अमळनेर : ऑक्टोबर महिना लागला तरी पाऊस थांबायचे नाव घेत नाही. पावसाने हाहाकार माजवला असून बोरी व पांझरा नदीला पूर आला आहे. अक्कलपाडा आणि तामसवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तर शेतांमध्ये पाणी घुसून कापूस ,मका ,बाजरी पिकांचे पुन्हा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नगाव येथे वीज पडून बैल मेला आहे.
यंदा सरासरी पेक्षा जास्त म्हणजे १५० टक्केच्या जवळपास पाऊस पडला आहे. १० आणि ११ ऑक्टोबर ला वादळी पाऊस झाल्याने काही ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या तर काही ठिकाणी नवरात्र साठी उभारण्यात आले मंडप ,लायटिंग ,बॅनर यांचे नुकसान झाले आहे.
बोरी धरणाची पाणी पातळी २६७.१० मीटर झाली आहे. धरणाचे ६ दरवाजे ०.३० मीटर ने उघडून ५४१८ क्यूसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
तसेच निम्न पांझरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ६ हजार ९७० क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

