
अमळनेर:- पीक पेरा पाहणी मध्ये नाव आलेले नाही मात्र सातबारावर पीक नोंदणी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला तर त्यांना कापूस सोयाबीन अनुदान का मिळाले नाही याबाबत काँग्रेसने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
पीक पाहणीत ज्यांची नावे कापूस सोयाबीन लागवड मध्ये आहेत त्यांना कापूस व सोयाबीन चे ५ हजार रुपये अनुदान मिळत आहे. मात्र सात बारावर नोंद असूनही काहींची नावे पीक पाहणी मध्ये न आल्याने त्यांना अनुदान मिळत नाही. असे अनेक शेतकरी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने अप्पर मुख्य सचिव (महसूल ) राजेशकुमार यांनी आदेश दिले की ज्यांच्या सातबारावर कापूस व सोयाबीन पिकांच्या नोंदी आहेत मात्र ई पिक पाहणीत त्यांची नावे नाहीत अशा शेतकऱ्यांची महसूल विभागाने यादी करून कृषी विभागाला द्यावी. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जर शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन वर पीक विमा मंजूर होतो तर त्यांना अनुदान मिळालेच पाहिजे या मागणीसह इतर मागण्यांसाठी कॉग्रेसचे भगतसिंग पाटील ,डॉ अनिल शिंदे ,प्रा सुभाष पाटील ,सुरेश पाटील , धनगर पाटील ,त्र्यंबक पाटील , मालोजीराव पाटील , प्रतापराव पाटील ,समाधान पाटील, किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारींना निवेदन दिले आहे.




