
कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे शाम पाटील यांना पाठिंब्याचे पत्र व्हायरल…
अमळनेर:- विधानसभेसाठी नामांकन दाखल करण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा अमळनेर मतदारसंघातील अंतर्गत राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे.
अमळनेर मतदारसंघातील महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाकडून माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील इच्छूक आहेत.त्यांच्या समर्थकांकडून तशी मोर्चेबांधणी देखील करण्यात येत होती.मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात सक्षम पर्याय म्हणून देखील महाविकास आघाडीकडून त्यांना पाहिलं जात असताना त्यांनी अचानक दुसऱ्या उमेदवारास पाठिंबा देत असल्याचे पत्र व्हायरल झाल्याने मतदारसंघातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र पाठवून अमळनेर शहराचे रा.काँ. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष व इच्छूक उमेदवार शाम जयवंतराव पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. या घडामोडीमुळे पक्ष काय भूमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की साहेबराव यांची यामागे काही खेळी आहे हे काही दिवसात समजेलच.
आर्थिक पाठबळ असू शकते मुख्य कारण…
उमेदवारीसह वरिष्ठ पातळीवरून आर्थिक पाठबळ ही देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याने साहेबराव पाटील माघार घेत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी ही याला दुजोरा दिला आहे. तसेच उमेदवारी मिळाल्यास तुतारीतील अनेक उमेदवार असलेले अन्य नेते विरोधात काम करतील अशी भीती ही साहेबराव पाटील यांना आहे.
२००९ मध्ये मंत्रिपद नाकारल्याचा पश्र्चाताप…
२००९ मध्ये केवळ विकासासाठी मंत्रिपद नाकारले याचा पश्र्चाताप त्यांना २०२४ मध्ये होत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सागितले आहे. मात्र कानामागून आली आणि तिखट झाली ह्या म्हणीप्रमाणे अनिल पाटील यांना महत्त्वाची पदे, मंत्रिपद मिळाले आणि ते अजित पवारांचे निकटवर्तीय झाल्याने साहेबराव यांना हे सर्व मिळवण्याची संधी असून ही न मिळाल्याने मोठी खंत लागून आहे. तसे त्यांनी अनेकदा बोलून ही दाखवले आहे.
साहेबराव पाटील यांची पुन्हा खेळी ???
साहेबराव पाटील यांना उमेदवारी करायचीच नव्हती, फक्त उमेदवारी मागायची, वेळकाढू धोरण ठेवायचे आणि ऐनवेळी माघार घेवून तुलनेने कमी बलाढ्य उमेदवाराला उमेदवारी मिळवून द्यायची, अशी ही पडद्यामागे ठरल्याप्रमाणे खेळी असू शकते, अशी ही शंका आता अनेकजण व्यक्त करत आहेत.




