
१ कोटी ६५ लाख रुपयांच्या ठिबक अनुदानापासून राहिले वंचित…
अमळनेर:- तालुका कृषी अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दिरंगाई व कर्तव्यात कसुरीमुळे अमळनेर तालुक्यातील सुमारे १३५ शेतकरी १ कोटी ६५ लाख रुपयांच्या ठिबक अनुदानापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दांगडो केला.
शासनाकडून अमळनेर तालुक्यासाठी ४९४ शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ४६ हजार रुपये अनुदान मंजूर होते. मात्र अमळनेर तालुक्यातील कृषी कार्यालयातील कर्मचारी कृषी सहायकांच्या आपसातील वादामुळे वरिष्ठ पातळीवर याद्याच गेल्या नसल्याने सुमारे १३५ शेतकरी वंचित राहिले. ३५९ शेतकऱ्यांना २ कोटी ३५ लाख १९ हजार ९५५ रुपये अनुदान मिळाले. वेळेवर याद्या न गेल्याने १३५ शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास १ कोटी ६५ लाख २६ हजार ४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत शेतकरी संतप्त होऊन तालुका कृषी कार्यालयावर धडकले. त्यांनी कृषी अधिकाऱ्याला जाब विचारला. यावेळी कृषी अधिकारी सी जे ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांच्या चुकीची माफी मागितली. मी तुमचा प्रस्ताव पाठवतो त्यावेळी शेतकऱ्यांनी साहेब आचारसंहिता सुरू आहे. आणि सरकारने इतक्या योजना मंजूर करून ठेवल्या आहेत तर अनुदान कसे मिळेल? असे सांगितले.
यावेळी संदीप पाटील,संजय पवार, बाबूलाल पाटील, सुनील पाटील, मधुकर पाटील, जितेंद्र पाटील, कैलास पाटील, श्रीपाल झाबक, दिनेश पाटील, सुधीर पाटील, योगेश पाटील, बापूराव महाजन, चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निंबा पाटील, उमेश साळुंखे, योगेश पाटील, विकास जाधव, हेमंत पाटील हजर होते.
तालुका कृषी अधिकारी यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही…
तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात वेळोवेळी आंदोलने होत असून कार्यालयीन प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी ठाकरे हे समस्या हाताळण्यात प्रत्येकवेळी अपयशी ठरले आहेत. या ठिबक प्रकरणात ही त्यांनी चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार केला असून जबाबदार कर्मचाऱ्याला सोडून नवीन कर्मचाऱ्याला नोटीस बजावत आहेत. त्यांच्या कर्मचारी वर्गात ही त्यांच्याविषयी असंतोष असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच स्वतःच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसल्याचे या प्रकरणातून समोर येत आले आहे.
प्रतिक्रिया…
कर्मचाऱ्यांची थोडी चूक आहे. मात्र नंतर प्रस्ताव पाठवून जादा अनुदान मागवून उर्वरित शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न असेल.
– सी जे ठाकरे, तालुका कृषी अधिकारी




