
३८ नामनिर्देशन पात्रांची विक्री,एका उमेदवाराला फक्त चार अर्ज भरता येणार….
अमळनेर:- विधानसभा मतदार संघासाठी २२ पासून उपविभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.काल पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही मात्र 15 उमेदवारांनी 38 नामनिर्देशन पत्र खरेदी केले आहेत.
अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार स्वतः किंवा त्यांचा कमीत कमी एक प्रस्तावक हजर असणे आवश्यक आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ असून अर्ज भरण्यासाठी उमेदवार स्वतः अथवा प्रस्तावक हजर राहणे आवश्यक आहे. एका उमेदवाराला दोनच विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. तर एका ठिकाणी उमेदवाराला फक्त चार अर्ज भरता येतील. पक्षाच्या उमेदवारासाठी एक प्रस्तावक आणि अपक्ष उमेदवारासाठी दहा प्रस्तावक आवश्यक असतील. प्रस्तावक हे मतदार संघातीलच मतदार असणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सादर करावे लागणार आहे. सर्वसाधारण उमेदवारासाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. पक्षाचा एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. एबी फॉर्म मूळ शाईच्या स्वाक्षरीत असावा. उमेदवाराने अर्ज भरतेवेळी फक्त चार लोकांनाच सोबत आणावे तसेच सोबत फक्त तीनच वाहने आणावीत असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी केले आहे.




