
तांत्रिक चूक असून दुरुस्त होईल, जिल्हा पीक विमा अधिकाऱ्यांकडून खुलासा
अमळनेर:- तालुक्यातील दहा टक्के म्हणजे सुमारे सहा ते साडे सहा हजार शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. तर ही तांत्रिक चूक असून दुरुस्त होईल असे जिल्हा पीक विमा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
१५ जूननंतर पीक विमा काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. ऑक्टोबर महिना आला आणि अचानक तालुक्यातील सुमारे ६ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द झाला. शेतकऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी असेल अथवा कागदपत्रे अपूर्ण असतील , किंवा सामूहिक शेती बाबत अडचण असेल तर असे प्रकरणे रिव्होट मध्ये टाकले जातात. मात्र अमळनेर तालुक्यातील सुमारे १० टक्के शेतकऱ्यांचे प्रकरणे योग्य असतांनाही रिजेक्ट करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
याबाबत शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील यांनी जिल्हा विमा अधिकारी समाधान पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी समाधान पाटील यांनी ही तांत्रिक चूक असून रिजेक्टेड पॉलिसी संदर्भात मेल करावा, एकाच मेल मध्ये रिजेक्टेड पॉलिसीची पावती जोडा. कंपनीला मेल करून काही दिवसात ते व्हेरिफाय होतील किंवा पेंडिंग पर्यायात दाखवतील. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही असे सांगितले. तर प्रा सुभाष पाटील यांनी जिल्हा कृषी अधिकारी तडवी यांच्याशी देखील चर्चा केली. त्यावेळी त्यांनी याबाबत पीक विमा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी करा त्यांचा काय प्रतिसाद येतो त्यावर योग्य निर्णय घेऊ असे सांगितल्याचे प्रा सुभाष पाटील यांनी सांगितले.




